Bigg Boss 13 Finale: 10 लाख रुपये घेऊन पारस छाबडा बिग बॉस फिनालेमधून बाहेर; जेतेपदासाठी सिद्धार्थ शुक्ला व आसिम रियाज यांची नावे चर्चेत
Bigg Boss 13 (Photo Credits: Twitter)

अखेर तो दिवस  आला, गेले साडेचार महिने सुरु असलेल्या बिग बॉस 13 चा आज फिनाले (Bigg Boss 13 Finale). एकूण सहा सदस्य यंदाच्या फिनालेमध्ये पोहचले आहेत. बिग बॉसचा सीझन 13 हा आतापर्यंतचा सर्वांत हिट सीझन आहे. शोने आतापर्यंतचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. भारतीय टेलीव्हिजन क्षेत्रातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस 13 चे नाव घेतले जाते. या शोला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हा शो आणखी चार आठवडे वाढवण्यात आला होता. आज या शोच्या विजेत्याचे नाव घोषित होणार आहे.

सध्या सिद्धार्थ शुक्ला, आसिम रियाज, रश्मि देसाई, पारस छाबड़ा, आरती सिंह आणि शहनाज गिल असे हे टॉप-6 स्पर्धक आहेत. मात्र सोशल मिडीयावर चालू असलेल्या चर्चेनुसार आसीम किंवा सिद्धार्थ या दोघांपैकी कोणीतरी विजेता ठरणार आहे.

आज, 15 फेब्रुवारी रोजी देशातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शो, बिग बॉसच्या 13 व्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पण बिग बॉस प्रेमींमध्ये हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, सीझन 13 ची बक्षीस रक्कम काय आहे? बिग बॉस 13 ची बक्षीस रक्कम चॅनेल व निर्मात्यांनी जाहीर केली नाही. मात्र बिग बॉस 13 ची बक्षीस रक्कम दुप्पट झाल्याचे वृत्त आहे. ही रक्कम 50 लाखांवरून 1 कोटी झाली आहे.

बिग बॉस 13 च्या फॅन पेजनुसार शोचे निर्माते सिद्धार्थ शुक्लाला विजेता बनवण्यासाठी उत्सुक आहेत. पण सलमान खान या निर्णयाच्या विरोधात आहे. असे सांगितले जात आहे की, मेकर्स आणि सलमान यांच्यात एक बैठक होणार होती, ती रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर निर्माते सिद्धार्थला विजेता बनवण्यावर ठाम आहेत. यामुळे सलमानने आता फिनालेला होस्ट करण्यास नकार दिला आहे. बाकी सत्य काय ते आज समजेलच. (हेही वाचा:  सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या लग्नाला घरच्यांची परवानगी; पहा काय म्हणाले Shehnaz Gill चे वडील (Video)

दुसरीकडे, स्पॉटबॉयच्या अहवालानुसार पारस छाबडा 10 लाख रुपये घेऊन फिनाले मधून बाहेर पडला आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे या वेळी बिग बॉसच्या घरी पैशाची बॅग आणली गेली आणि सर्व स्पर्धकांना ही रक्कम घेऊन शोमधून बाहेर पडण्याची संधी देण्यात आली. पारस छाबडाने हे पैसे घेण्याचे ठरविले व तो फिनालेच्या रेस मधून बाहेर झाला. दुसरीकडे आरती सिंहदेखील फिनाले मधून बाहेर गेल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, यंदाचा बिग बॉसचा सीझन हा मोठ्या चढ उतारांनी भरलेला होता. सर्वच स्पर्धक अतिशय तगडे होते, त्यात सिद्धार्थ, आसिम, पारस, रश्मी, शेहनाज या स्पर्धकांच्या भांडणांमुळे शोचा टीआरपी प्रचंड वाढला. मात्र शोमध्ये आसिम आणि सिद्धार्थ या दोघांचे योगदान फार जास्त राहिले. आता या दोघांपैकी कोणी एक विजेता होण्याची शक्यता आहे. आज रात्री 9 वाजता शोचा फिनाले सुरु होणार आहे, त्यामध्ये हे समजेलच.