बिग बॉस १२ च्या घरात अनूप जलोटा घेणार सर्वाधिक मानधन
अनुप जलोटा (Photo Credits : Twitter)

बिग बॉस १२ या पर्वाकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. सलमान खान सलग ९ व्या वेळेस या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. मात्र यंदाची थीम हा 'जोडीचा मामला' आहे. त्यामुळे कोणकोणत्या जोड्या यंदा बीग बॉसच्या घरात प्रवेश घेणार याबाबत बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. बिग बॉसच्या घरात १७ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. काही स्पर्धक जोड्यांमध्ये तर काहींनी एकट्यानेच प्रवेश केला आहे.

सर्वाधिक मानधनाचा स्पर्धक कोण ?

सेलिब्रिटी आणि सामान्य लोकांमधून काही जणांची निवड झाली आहे. गायक अनुप जलोटा यांनी गर्लफ्रेंड जसलीन मटरूसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. ६५ वर्षीय अनूप जलोटा हे सध्या बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक असल्याचं बोललं जात आहे. गायक अनूप जलोटा यांना दर आठवडा सुमारे ४५ लाख मानधन मिळणार असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समधून स्पष्ट करण्यात आलं आहे.

भजन गायकीसाठी लोकप्रिय असलेल्या अनूप जलोटा बिग बॉसमुळे पुन्हा प्रकाशझोकात आले आहेत. विनम्र आणि वादविवादांपासून दूर राहणारे अनूप जलोटा बिग बॉसच्या घरात किती काळ टिकू शकतात? कसा असेल त्यांचा प्रवास हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे. अनूप जलोटा पाठोपाठ लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता  करणवीर वोहराला आठवड्याला २० लाख आणि अभिनेत्री दीपिका कक्कडला १५ लाखाचं मानधन मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

नेहा पेंडसेची एंट्री

 

बिग बॉस १२ या यंदाच्या पर्वात मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचीही एन्ट्री झाली आहे. नेहा सोबत क्रिकेटर श्रीसंत, अभिनेता करणवीर वोहरा   , दीपिका कक्कर, अनूप जलोटा, जसलीन मथारू , सौरभ पटेल ,शिवाशीष मिश्रा ,रोमिल चौधरी आणि निर्मल सिंह ही पोलिस आणि वकिलाची जोडीही घरात आली आहे. रोशमी बनिक,कीर्ति वर्मा, गायक दीपक ठाकुर सोबत शिष्या उर्वशीने घरात प्रवेश केला आहे.