Ashwini Mahangade चा वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीची उद्विग्नता! मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना टॅग करुन रुग्णालयाबाबत विचारले 'हे' प्रश्न
Ashwini Mahangade and her Father (Photo Credits: Facebook)

आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील अनघा हे पात्र साकारणा-या अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी दु:खद निधन झाले. कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण महांगडे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनाला 15 दिवस उलटल्यानंतर अश्विनीच्या संयमाचा बांध फुटला आणि घडलेल्या प्रकाराबाबत व्यक्त झाली. देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे निधन झाले. मात्र साताऱ्यातील वाईमधील ज्या बाबर हॉस्पिटलमध्ये अश्विनीच्या वडिलांवर उपचार करण्यात आले, ते हॉस्पिटल आणि डॉक्टर बोगस असल्याचं तिच्या निदर्शनास आले असल्याची पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर शेअर करत तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टॅग करत काही प्रश्न विचारले आहेत.

"माझ्यासारखे पोरके व्हायचे नसेल तर कृपया आपल्या नातेवाईकांना बाबर हॉस्पिटल, वाई मध्ये उपचारासाठी पाठवू नका", अशी विनवणी अश्विनीने सोशल मीडियावरुन केली आहे.हेदेखील वाचा-आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे च्या वडिलांचं कोविड 19 मुळे निधन

ज्या खाजगी हॉस्पिटलला तुम्ही कोरोना सेंटर म्हणून पत्र देता, त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहीतच धरता का? मी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारच, असा थेट सवाल अश्विनीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला आहे.

डॉ. बाबर खरंच डॉक्टर आहेत का? तसेही वाई तालुक्याला कोणीही स्वतःला डॉक्टर बोलवून घेण्याचा शाप आहेच म्हणा. सकाळपासून डॉ. बाबर यांच्या डॉक्टर नसण्याचे बरेच पुरावे मेसेज स्वरुपात मला मिळाले. इतक्या लोकांना हाच अनुभव असूनही यांचे दुकान हो दुकानच अजून सुरूच आहे. लोक काही दिवसांनी माझी पोस्ट सुद्धा विसरतील कदाचित आणि यांचे माणसं मारण्याचे यंत्र राजरोसपणे सुरूच राहील का? असा प्रश्नही अश्विनीने विचारला आहे.

माझ्या बऱ्याच जवळच्या पोलीस आणि वकिलांनी हेच सांगितले की केस करा. पण मला माहित आहे आज त्यांच्या लेटर पॅड वर लिहून पुरावे देऊन कायद्याच्या कचाट्यातून कसे बाहेर पडायचे हे यांना नवीन नाही. नाना (अश्विनीचे वडिल) उपचारासाठी दाखल झाल्यापासून त्यांच्यावर काय उपचार झाला? यातले आम्हाला काहीच माहीत नाही. ना आमच्यापैकी कोणी नानांना आत जाऊन भेटले. हे डॉक्टर नेमका काय उपचार करत आहेत हे सांगण्यासाठी ते बांधील नाहीत का? म्हणजे फक्त बिल भरण्यासाठी नातेवाईक गरजेचे आहेत. पण आपण प्रश्न विचारला तर या डॉक्टरांचा इगो दुखावतो की यांना काय अक्कल आहे की हे आम्हाला प्रश्न विचारतात? अशा शब्दात अश्विनीने उद्विग्नता व्यक्त केली आहे.