Ramayan's Ravan, Arvind Trivedi Passed Away (Photo Credits: Twitter)

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची सुप्रसिद्ध टीव्ही मालिका 'रामायण' (Ramayana) यामध्ये रावणाची भूमिका साकारलेल्या अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचे मंगळवारी रात्री मुंबई येथे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील काही काळापासून त्यांची प्रकृती खालावली होती. परंतु, मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्या इतर अवयवांनी देखील काम करणे बंद केले, अशी माहिती अरविंद त्रिवेदी यांचा पुतण्या कौस्तुभ त्रिवेदी यांनी ET Times शी बोलताना दिली. दरम्यान, मुंबई (Mumbai) मधील कांदीवली पश्चिम येथील डहाणू कारवडी येथे त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जातील.

रामायण मध्ये रावणाच्या भूमिकेशिवाय त्यांनी टीव्ही मालिका 'विक्रम वेताळ' यात देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसंच गुजराती सिनेमांत त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. 'देश रे जोया दादा परदेश जोया' हा त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात सुप्रसिद्ध सिनेमा राहिला. 1991 ते 1996 दरम्यान ते खासदार होते. तसंच 2002-2003 या काळात ते Central Board for Film Certification चेअरमन देखील राहिले आहेत.

त्रिवेदी यांच्या सोबत सिनेमांमध्ये काम केलेले निर्माते के. अमर यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. "त्रिवेदी हे अत्यंत चांगले व्यक्ती होते आणि त्यांची विनोद बुद्धी कमालीची होती. Maatema Bija Vagdana Vaa हा त्यांचा शेवटचा गुजराती सिनेमा राहीला," असे के. अमर यांनी सांगितले.

दरम्यान, मागील वर्षी कोरोना लॉकडाऊन काळात 'रामायण' मालिका टीव्हीवर पुन:प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर मालिकेसह यातील कलाकार ट्रेंडिंगमध्ये होते. या काळात अरविंद त्रिवेदी यांनी देखील ट्विटर जॉईन केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते.