Mahabharat: DD वाहिनीनंतर आता 'कलर्स' वाहिनीवर प्रेक्षकांना घेता येणार 'महाभारत' पाहण्याचा आनंद; जाणून घ्या मालिकचा वेळ
महाभारत (PC - Instagram)

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्वत्र थैमान घातले आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात आतापर्यंत तीन वेळा लॉकडाऊनचा (Lockdown) काळावधी वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार देशात येत्या 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. सरकारकडून नागरिकांना लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या काळात अनेक बॉलिवुड कलाकार तसेच विविध वाहिन्या नागरिकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिक टीव्हीवरील या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. सध्या अनेक वाहिन्या जुने कार्यक्रम दाखवत आहेत. या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन डीडी वाहिनी नंतर आता कलर्स वाहिनीनेदेखील 'महाभारत' (Mahabharat) मालिकेचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना कलर्स वाहिनीवर आजपासून दररोज संध्याकाळी 7-9 या वेळात महाभारत पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा - मुंबईमध्ये आज 510 नव्या कोरोना रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर 18 जणांचा कोरोनामुळे बळी; मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 9123 वर पोहोचली; 4 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

महाभारत मालिकेमध्ये नितीश भारद्वाज, मुकेश खन्ना, रुपा गांगुली, गजेंद्र चौहान आणि पुनित इस्सार या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. रवी चोप्रा यांनी दिग्दर्शन केलेली ही मालिका पहिल्यांदा 1988-90 च्या दरम्यान पाहायला मिळाली होती. नवीन पिढीला आजही या मालिकेविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात महाभारत मालिकेमुळे नागरिकांचे मनोरंजन होत आहे.