हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या शैलीमुळे लोकप्रिय असलेला आदित्य नारायण (Aditya Narayan) पुन्हा चर्चेमध्ये आला आहे. आदित्य सध्या 'इंडियन आयडॉल' चं सूत्रसंचलन करत आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये त्याने महाराष्ट्रातील 'अलिबाग' (Alibaug) बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आदित्यने त्याच्या या अलिबाग बद्दलच्या वक्तव्याबाबत सुरू झालेल्या कॉन्ट्रव्हर्सीला काही तासांतच पूर्णविराम दिला आहे. आदित्यने सोशल मीडीयामध्ये त्याच्या वक्तव्याची जाहीर माफी मागितली आहे. 'कळत-नकळत झालेल्या चूकीमुळे अलिबागवासियांचे माझ्याकडून मन दुखावले गेले आहे. मी त्याबद्दल हात जोडून माफी मागतो. माझी अपेक्षा आहे तुम्ही मोठ्या मनाने मला माफ देखील कराल' अशा आशयाची पोस्ट आणि व्हिडिओ आदित्यने जारी केला आहे.
मागील काही दिवसांपासून इंडियन आयडॉल आणि त्याचा सूत्रसंचालक आदित्य चर्चेमध्ये आहे. दरम्यान एका स्पर्धकाच्या गाण्यानंतर आदित्यने आपली प्रतिक्रिया देताना 'अलिबाग' वर टीपण्णी केली होती. त्यावरून मनसे चित्रपटसेना आणि अमेय खोपकर आक्रमक झाले होते. त्यांनी व्हिडीओ द्वारा आदित्यला त्याची चूक दाखवून देत इशारा दिला होता. नंतर आदित्यही आपली चूक स्वीकरली.
आदित्य नारायण याची माफी
दरम्यान 'अलिबागचा आहेस का' या वाक्यावरून अनेकदा टर उडवण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना झाल्या आहेत. मध्यंतरी यावरून कोर्टातही प्रकरणं सुरू होती. पण मनसेने आदित्य सह सोनी टीव्हीला उद्देशून इशारा देताना अशा उपहासात्मक टीपण्णीमुळे अलिबागकरांचा होणारा अपमान पुन्हा सहन केला जाणार नाही असं सांगितलं आहे.
आदित्य नारायण हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. सिनेक्षेत्र, पार्श्वगायन यासोबत आदित्य सूत्रसंचालनातही रमला. अनेक सुपरहीट रिअॅलिटी शोचा तो एक आता अविभाज्य भाग बनला आहे.