Kishor Das Passed Away: अभिनेता किशोर दास ने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; 'या' गंभीर आजाराने झाले निधन
Kishor Das (PC - Instagram)

Kishor Das Passed Away: गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वातून सातत्याने दु:खद बातम्या येत आहेत. अशातचं आता शनिवारी मनोरंजन विश्वातून अशीच एक दुःखद बातमी ऐकायला मिळाली. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार किशोर दास (Kishor Das) यांचे निधन झाले आहे. सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही बातमी समोर येताच त्याचे चाहते आणि जवळच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे.

दरम्यान, 2 जुलै रोजी चेन्नईतील रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होता. या आजारावर मात करण्यासाठी त्यांच्यावर बराच काळ उपचारही सुरू होते. मात्र, दीर्घ लढ्यानंतर अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मावळली. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. (हेही वाचा -Threat to Jay Bhanushali-Mahhi Vij’s Family : अभिनेता जय भानुशाली आणि माही विजच्या चिमुकलीला जीवे मारण्याची धमकी)

रिपोर्टनुसार, किशोर दास चेन्नईपूर्वी गुवाहाटीमध्ये उपचार घेत होता. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला चेन्नईला रेफर करण्यात आले. या वर्षी मार्चमध्ये अभिनेत्याला उपचारांसाठी चेन्नईला पाठवण्यात आले होते. दुसर्‍या रिपोर्टनुसार, कॅन्सर व्यतिरिक्त किशोरला कोरोना व्हायरसचीदेखील लागण झाली होती. त्याच्या मृत्यूचे कारण कोरोनासारखी धोकादायक महामारी असल्याचेही बोलले जात आहे.

कॅन्सर आणि कोरोनामुळे त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आसामी अभिनेता किशोर दास हा एक प्रसिद्ध कलाकार होता. त्याने 300 संगीत अल्बममध्ये काम केले होते. त्याचे तुरुत तुरुत हे गाणे आसामी उद्योगातील पहिल्या क्रमांकाचे गाणे ठरले. चित्रपट आणि गाण्यांव्यतिरिक्त तो टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध कलाकार होता. अनेक लघुपटांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या.