'बाला' या विनोदी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज; आयुष्मान साकारतोय ऐन तारुण्यात टकलेपण आलेल्या व्यक्तीचं पात्र
Bala Poster | (Picture Credit: Instagram)

आयुष्मान खुराणा (Ayushman Khurana) सध्या त्याच्या आयुष्याच्या 'पर्पल पॅच' मध्ये आहे. आजच त्याच्या आगामी बाला  (Bala) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अंधाधुन (Andhadhun) नंतर त्याची गाडी जी सुरु झाली, ती आता इतकी सुसाट पळते आहे कि त्याच्या केवळ नावावर तो सिनेमागृहांत गर्दी खेचत आहे. हा चित्रपट 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

आयुष्मान म्हटलं कि काहीतरी वेगळं असणार, असाच आता प्रेक्षकांचा समज झालेला आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या धाटणीचे, खासकरून समाजात कमी प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या, समाजमनाकडून दुर्लक्षित झालेल्या सजीव घटकांचे आणि काल्पनिक घटनांचे अनेक विषय त्याने सातत्याने हाताळले आहेत. आताही तो ट्रेंड त्याने चालू ठेवलाय. या चित्रपटात त्याने अकाली आलेल्या टकलेपणाचा एखाद्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवले आहे. त्यानंतर तो या समस्येवर काय काय उपाय करतो, कुठले मार्ग अवलंबतो, हि या चित्रपटाची उर्वरित कथा आहे.

'बाला ' चा ट्रेलर:

(हेही वाचा.'उझडा चमन' कि 'बाला': बॉलीवूडमध्ये सुरु झालाय नवा वाद, दोन 'टकले' उभे ठाकलेत एकमेकांसमोर)

सोबतच, या चित्रपटात रंगभेदावरही भाष्य केलेले आहे. विषय जरी काहीसा अवघड वाटत असला, तरीही चित्रपटाची हाताळणी पूर्णपणे विनोदी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक याने केले आहे. तसेच या चित्रपटात त्याच्या सोबतच भूमी पेडणेकर आणि यामी गौतमही प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच, जावेद जाफ्री, सीमा पहावा, सौरभ शुक्ला हि मंडळी सहाय्यक भूमिकेत आहेत.