स्वतःबद्दल कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता समाजात प्रचलित असलेल्या सर्व समजांना छेद देऊन आपला स्वतःचा ठसा जनमानसात कसा उमटवायचा ह्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर आता हिंदी मध्येही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या सगळ्यांचा लाडका सिद्धूचा आज वाढदिवस. सिद्धूने आज 39 व्या वर्षात पदार्पण केले आहे. सुरवातीला सहाय्यक भूमिका करणारा सिद्धू बघता बघता सुपरस्टार झाला आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागला.
वाढदिवसानिमित्त दिलेल्या एक्सक्लुजिव्ह मुलाखतीत सिद्धू म्हणाला, ''माझ्या बर्थडेसाठी मी नेहमीच उत्साही असतो. मागच्या वर्षीच्या बर्थडे मी सिम्बाच्या (Simmba) सेटवर रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) सोबत साजरा केला होता तर या वेळी मी माझ्या एका नवीन चित्रपटाच्या शूट मध्ये व्यस्त आहे. पण असं असला तरीही हा बर्थडे माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझ्या मोठ्या मुलीने मला एक गिफ्टचा बॉक्स दिलाय आणि दम भरलाय की बर्थडेच्या आधी तो उघडायचा नाही. त्यामुळे आज आता मी तो बॉक्स उघडणार आहे आणि मला खात्री आहे, की हे गिफ्ट आजवरचं माझं बेस्ट गिफ्ट असणार आहे."
(हेही वाचा. सिद्धार्थ जाधव सोबत जेव्हा रोहित शेट्टी मराठीतून म्हणाला 'दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा' (Video)
सिद्धूला त्याच्या आठवणीतला आत्तापर्यंतचा सर्वात स्पेशल बर्थडे विचारल्यावर सिद्धूने सांगितले,"मी कॉलेजला असताना माझ्या मित्रांनी सेलीब्रेट केला होता. कॉलेजला जाईपर्यंत एकदाही माझा वाढदिवस मी कधी साजरा केला नव्हता. पण मला आठवतंय रुपारेलला असताना आमची 'हम्प्टी डम्प्टी' नावाची एक भिंत होती, त्यावर बसून आम्ही केक कापला होता. तर दुसरं म्हणजे माझ्या बायकोने एकदा आम्ही डेट करत असताना मला एक सोन्याची चेन गिफ्ट म्हणून दिली होती. हे दोन बर्थडे कायम लक्षात राहतील माझ्या."
आता शूट करत असलेल्या चित्रपटाबाबत विचारल्यावर, "चित्रपटाचं नाव '100 वेळा शोले पाहिलेला माणूस' असं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आम्ही आता वैभववाडीत आलो आहोत." असे सिद्धू म्हणाला.