नव्या 'कागर' चित्रपटामधून रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या भेटीला; 'व्‍हॅलेंटाईन डे'ला साजरा होणार प्रेमाचा उत्सव!
कागर (Photo credit : Facebook)

नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ मधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली जोडी म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर. पुरुषप्रधान चित्रपटांचे वर्चस्व असूनही रिंकूने आर्चीचे वेगळेपण इतक्या प्रभावीपणे दाखवले की, मराठीच नाही तर अमराठी लोकांच्या मनातही रिंकूने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना रिंकूने या आपल्या पहिल्या चित्रपटात जे कसब दाखवले त्यामुळे साहजिकच तिच्याकडून असलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा फारच वाढल्या होत्या. म्हणूनच आता 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नव्‍या चित्रपटातून प्रेक्षकांच्‍या भेटीला येत आहे. येत्या 14 फेब्रुवारी, 2019 रोजी रिंकूचा ‘कागर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून रिंकूच्या या कागर चित्रपटाची चर्चा रंगली होती. मध्यंतरी या चित्रपटाशी निगडीत रिंकूचा एक डान्स व्हिडीओदेखील प्रकाशित झाला होता. मात्र आता हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात एका पडद्यामागे साडीमधील रिंकू दिसत आहेत.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने सिनेमाची निर्मिती केली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी रिंगण आणि यंग्राड असे दोन चित्रपट मकरंद यांनी दिग्दर्शित केले आहेत.

सैराट चित्रपटानंतर रिंकू त्याचाच कन्नड रिमेक ‘मनसु मल्लिगे’मध्ये दिसली होती. कागर हा रिंकूचा तिसरा चित्रपट आहे.