
मराठी सिनेसृष्टीमधील कलादिग्दर्शक राजू साप्ते (Raju Sapte) यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत लेबर युनियनच्या दबावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत 2 जणांना अटक झाली आहे. चंदन ठाकरे आणि नरेश विश्वकर्मा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर अजूनही काही आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या मुंबई आणि पुणे पोलिसांकडून चौघांचा शोध सुरू आहे. एकूण 5 पथकांकडून शोध सुरू आहे.
दरम्यान चंदन ठाकरे हे राजू साप्ते यांचे व्यावसायिक भागिदार होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. राजू यांच्या पत्नी सोनाली यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे 5 जणांविरूद्ध तक्रार नोंदवली आहे. त्यावरून आता आरोपींचा शोध सुरू आहे. लेबर युनियनचे राकेश मौर्य, मिस्त्री, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे यांचा शोध सुरु आहे.
राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर मनसेच्या चित्रपट सेनेकडूनही इशारा देण्यात आला आहे. 'याच्या पुढे कोणत्याही निर्मात्या, दिग्दर्शक, कलाकाराला जर सेट वर जाऊन त्रास दिलात तर हातपाय तोडून ठेवल्या शिवाय राहणार नाही.' असा धमकी वजा इशारा अमेय खोपकर यांनी काल ट्वीट केला आहे. कला दिग्दर्शक राजू साप्ते यांची आत्महत्या; मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला 'हा' इशारा (Watch Video).
राजू साप्ते यांनी शनिवार,(3 जुलै) दिवशी पुण्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. 'राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तात्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’असे त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे.