Prakash raj to play natasmrat | (pic credit: wikimedia and IANS)

 

'कुणी घर देतं का घर' आता तेलगू मध्ये ऐकायला मिळणार असून प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज  (Prakash Raj) 'नटसम्राट' अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक कृष्णा वामसी बरेच दिवस बेलवलकरांचं पात्र साकारू शकेल अशा एका तगड्या कलाकाराच्या शोधात होते. आता शोध समाप्त झाला असल्याचं म्हटलं जात असून शिरवाडकरांच्या शब्दांचं चीज करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये बाहुबली मधील शिवगामी फेम रम्या क्रिष्णन पत्नीच्या भूमिकेत दिसणार असाही अंदाज आहे.

आयुष्यात एकदा तरी नटसम्राट साकारावा ही रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. शेक्सपियरची शोकांतिका 'किंग लेअर' वरून प्रेरित होऊन वि. वा. शिरवाडकरांनी 70 च्या दशकात नटसम्राट लिहिलं. हे नाटक रंगभूमीवर आलं आणि प्रेक्षकांना अक्षरशः वेडं करून सोडलं. (हेही वाचा. एका वर्षानंतर नाना पाटेकर पुन्हा येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला, #metoo च्या वादानंतर पहिल्यांदाच पडद्यावर)

आयुष्यभर प्रेक्षकांच्या प्रेमावर जगणाऱ्या एका नटसम्राटाची उतारवयात मुलाबाळांकडूनच होणारी अवहेलना म्हणजे 'नटसम्राट'. श्रीराम लागू, सतीश दुभाषी, दत्त भट यांसारख्या कित्येक दिग्गजांनी बेलवलकरांचं पात्र सजीव केलं. नंतर बऱ्याच वर्षांनंतर महेश मांजरेकरांनी यावर चित्रपट काढायचं शिवधनुष्य उचललं आणि नाना पाटेकरांच्या (Nana Patekar) पदरात नटसम्राटची भूमिका पडली. आधीच नावाजल्या गेलेल्या या कलाकृतीला त्यामुळे एक मोठा व्यासपीठ उपलब्ध झालं. त्यानंतर गुजराती मध्ये सुद्धा रिमेक बनवला गेला. आता तेलगू रिमेक कसा होतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.