Prema Kiran | (Photo Credits: Facebook)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचे हृयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 61 वर्षांच्या होत्या. मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे चाहते आणि निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेमांमध्ये अभिनयासोबतच प्रेमा किरण (Prema Kiran Passes Away) या एक यशस्वी निर्मात्याही होत्या. त्यांनी मराठी चित्रपटांशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले. प्रेमा किरण यांचे 'अर्धांगी', 'धूमधडाका', 'दे दणादण', 'गडबड घोटाळा', 'सौभाग्यवती सरपंच', 'माहेरचा आहेर', ‘कुंकू झाले वैरी’ आणि ‘लग्नाची वरातयांसारखे मराठी चित्रपट प्रचंड गाजले.

प्रेमा किरण यांनी साधारण 1980 ते 90 च्या दशकात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांची आणि लक्ष्मीकात बेर्डे यांची जोडी रसिक प्रेक्षकांनी खूप स्वीकारली. या जोडीला रसिकांनी आपल्या हृदयात स्थान दिले. मराठी चित्रपटातून त्यांनी साकारलेली 'अंबाक्का', 'अवडाक्का' ही पात्रे प्रचंड गाजली. त्यांच्या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत. प्रामुख्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांचे 'पोलिसवाल्या सायकलवाल्या' हे गाणे आजही प्रसिद्ध आहे. (हेही वाचा, Naomi Judd Passes Away: ग्रॅमी पुरस्कार विजेती अभिनेत्री नाओमी जुड हिचे निधन)

प्रेमा किरण यांनी अभिनयासोबतच चित्रपटनिर्मितीतही आपला ठसा उमठवला. 'उथावळा नवरा' (1989), थरकाप यांसारख्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. याशिवाय त्यांनी गुजराती, भोजपुरी, अवधी आणि बंजारा भाषेतील चित्रपटांमध्येही कामे केली. धुमधडाका (1985), इरसाल कारटी (1987), पागलपन (2001), अर्जुन देवा (2001), कुंकू झाले वैरी (2005) व लग्नाची वरात लंडनच्या घरात (2009) हे त्यांचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर चालले.