Fair & Lovely क्रीमच्या नावातून फेअर शब्द हटवण्याच्या निर्णयाचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने केले स्वागत; पहा काय म्हणाली
Sonali Kulkarni (Photo Credits: Facebook)

सौंदर्य म्हणजे गोरेपणा असं आपल्याकडे समीकरण झालं आहे. गेली अनेक वर्षे अनेक माध्यमातून गोरेपणाचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवलं गेलं आहे. त्यात जाहिरातींचा मोठा सहभाग आहे. हिंदुस्तान यूनिलीव्हर (Hindustan Unilever) कंपनीचे फेअर अॅण्ड लव्हली' (Fair & Lovely) हे अत्यंत प्रसिद्ध प्रॉडक्ट. गोरं होण्याच्या अट्टाहासापायी अनेकांनी या क्रीमचा वापर केला आहे. अगदी गावातील मुलांमुलींपासून शहरापर्यंत अगदी सगळ्यांनाच 'फेअर अॅण्ड लव्हली' ची भूरळ पडली आहे. गेली अनेक वर्षे गाजलेल्या या क्रीमच्या नावातून फेअर शब्द हटवण्याचा निर्णय 25 जून 2020 रोजी कंपनीने जाहीर केला. कंपनीच्या या निर्णयाचे अनेकजण कौतुक करत असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने देखील या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. (Fair & Lovely क्रीम या नावातून 'हिंदुस्तान यूनिलीव्हर' हटवार फेअर हा शब्द ; जाणून घ्या कारण)

हिंदुस्तान यूनिलीव्हर कंपनीच्या निर्णयाने झालेला आनंद सोनाली कुलकर्णी हिने व्हिडिओद्वारे व्यक्त केला आहे. सोनाली म्हणते, आपण आशिया खंडात, भारतात राहतो. त्यामुळे येथील हवामानाशी, मातीशी नातं सांगणारा आपला रंग आहे. परंतु, आपल्याला विदेशी गोरेपणाचं प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे गेली अनेक दशकं आपण आपला रंग नाकारत आहोत आणि गोरं होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहोत. त्याला आता आळा बसेल आणि आपण स्वतःला स्वीकारु. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात HUL च्या टीमने इतका सकारात्मक विचार केला. आणि यामुळे आपण विशिष्ट रंगाचे असलो तरच सुंदर दिसू या संकल्पनेतून पुढीच्या पीढी नक्कीच बाहेर काढलयं, याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. तसंच फेअर हा शब्द काढून टाकल्याने सामान्य माणसाला त्याच्या रंगाविषयी असलेला न्यूनगंड कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

सोनाली कुलकर्णी व्हिडिओ:

'फेअर अॅण्ड लव्हली' कंपनीच्या जाहिराती आणि नाव यामुळे अनेकदा कंपनीवर टीका झाली आहे. हे प्रॉडक्ट रंगभेदाला प्रोत्साहन देत असल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान अमेरिकेत जॉर्ज फ्लायड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या झाल्यानंतर जगभरातमध्ये वर्णभेदाविरुद्ध आंदोलन सुरु झाले. त्यामुळे वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एका उफाळून आला आहे. त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा सर्वत्र होत आहे.