दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही मंडळी माझ्या नावाचा गैरफायदा घेत आहेत; सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपवर प्रविण तरडे यांची प्रतिक्रिया
Actor, director Pravin Tarde l (Photo Credits: Facebook)

प्रवीण तरडे (Praveen Tarde) नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळा विचार करत असल्याने चर्चेत असतात. यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी पुस्तक गपणती ही संकल्पना ठेवत डेकोरेशन केले होते. प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या बाजूला पुस्तकांची सजावट केली होती. पण मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणी त्यांनी माफी देखील मागितली. परंतु तरीही समाजमाध्यमांमध्ये त्यांच्याबाबत काही चुकीच्या माहिती पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही मंडळी माझ्या नावाचा गैरफायदा घेत आहेत, अशीही प्रतिक्रिया त्यांनी फेसबूकच्या माध्यातून दिली आहे.

“माझ्या हातून घडलेल्या चूकीसाठी मी माफी मागितली आहे. लोकांनी मला माफ देखील केले आहे. परंतु काही मंडळी केवळ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी माझ्या नावाचा गैरफायदा घेत आहेत. माझ्या नावाने काही खोट्या बातम्या पसरवत आहेत. गेल्या तीन दिवसांत अनेक राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांशी मी फोनवर बोललो. कोणीही मला धमकी वगैरे दिलेली नाही, कोणीही माझ्या घरावर, ऑफिसवर हल्ला केलेला नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. चूकीच्या माहितीच्या आधारावर कोणावरही टीका टिप्पणी करु नका ही सर्वांना विनंती आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मी लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे.” हे देखील वाचा-Ekta Kapoor Ganesh Visarjan: एकता कपूरच्या घरी होणार 5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन; अनेक सेलेब्जनी लावली हजेरी (See Photo)

प्रवीण तरडे यांची फेसबूक पोस्ट-

'माझ्या घरी यंदा बाप्पासाठी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचे सर्वात मोठे प्रतिक अशी माझी भावना होती. असे असले तरी मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसेच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची सर्वांचीच जाहीर माफी मागतो', असे तरडे यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटले आहे.