Patil movie | (Photo Credits- Facebook)

मराठी चित्रपट सृष्टी आपल्या दर्जेदार कथा आणि लेखनासाठी प्रसिद्ध आहे. अशीच एक दर्जेदार कथा घेऊन ‘पाटील’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक संकटांवर मात करत स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त करून समाजात एक प्रेरणा निर्माण करणाऱ्या शिवाजी पाटील यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. त्यांचा भूतकाळ, त्यांचा जीवन संघर्ष आणि संकटांवर मात करून त्यांनी मिळवलेलं यश हे सगळं या चित्रपटात दाखवलं जाणार आहे. त्यासोबत एक हळुवार प्रेम कथा सुद्धा चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला २६ ऑक्टोबरला येणार आहे.

संतोष राममीना मिजगर यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली असून दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच आहे. विशेष म्हणजे हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीजर अमृता फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत एका पुरस्कार समारंभात प्रदर्शित करण्यात आला होता. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. विशेष म्हणजे कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील हे सुद्धा आपल्याला दिसणार आहेत.

भुमिकेविषयी प्रतिमा देशपांडे यांची प्रतिक्रिया:

चित्रपटात आपल्या भूमिकेविषयी बोलताना प्रतिमा देशपांडे म्हणतात, “हा माझा पहिलाच सिनेमा आहे आणि मला लहानपणापासूनच या क्षेत्रात काम करायचा होतं. या चित्रपटात मी पायल या मुलीची भूमिका करते आहे. ही मुलगी मुंबईला राहत असून ती खूप समंजस, अभ्यासू आणि ध्येयवेडी मुलगी आहे. तिला मैत्री आणि प्रेम या मधला फरक व्यवस्तीत समजतो. पहिल्याच चित्रपटात असा रोल करायला मिळणं हे माझं भाग्य आहे.

दिग्गज कलाकारांचं योगदान:

या चित्रपटात एकूण पाच गाणी असून आनंद शिंदे, आदर्श शिंदे, बेला शेंडे, सुखविंदर सिंग, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांच्या सारख्या दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. तर गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली आहेत. आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी आणि एस.आर.एम.एलियन यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. विशेष म्हणजे अमेय खोपकर यांच्या  ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ चे सहकार्य सुद्धा लाभलं आहे.