Chhaya Kadam

मुंबईस्थित स्वयंसेवी संस्था, प्लांट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी (PAWS) ने मुख्य वनसंरक्षक (ठाणे) आणि विभागीय वन अधिकारी (ठाणे) यांना पत्र लिहून, लापता लेडीज अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिने दिलेल्या एका मुलाखतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या मुलाखतीत कदम यांनी संरक्षित वन्यजीव प्रजातींचे मांस खाल्ल्याचे कथितपणे कबूल केले आहे. स्वयंसेवी संस्थेने वन अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, त्यांनी अभिनेत्री आणि मांसासाठी वन्यजीवांचे सेवन करणाऱ्या इतरांवर कायदेशीर कारवाई करावी. संस्थेने छाया कदम यांच्याविरुद्ध वन्यप्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेला विभागीय वन अधिकारी (दक्षता) रोशन राठोड यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘आम्हाला तक्रार मिळाली आहे. मुख्य वनसंरक्षकांनी ती चौकशीसाठी उपवनसंरक्षक (डीसीएफ) कडे पाठवली आहे. लवकरच अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले जाईल.’ छाया कदम यांची ही मुलाखत यूट्यूबवर प्रसिद्ध झाली असून, त्यात कदम यांनी हरिण, ससे, रानडुक्कर, पिसई, आणि साळींदर यांसारख्या प्राण्यांचे मांस खाल्ल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे वन्यप्राणी संरक्षणाच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो, असे पीएडब्ल्यूएसचे म्हणणे आहे.

पीएडब्ल्यूएसच्या मते छाया कदम यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी संरक्षित वन्यप्राण्यांचे मांस खाल्ले असून, यामध्ये रानडुक्कर, पिसई, घोरपड, साळींदर, ससा अशा प्राण्यांचा समावेश होतो. या प्रजाती भारताच्या वन्यप्राणी (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत संरक्षित आहेत. अशा प्रजातींचे शिकार करणे किंवा त्यांचे मांस खाणे हा गंभीर गुन्हा आहे, आणि कदम यांचे वक्तव्य हे कायद्याचे उल्लंघन आहे. याशिवाय, जैवविविधता कायदा, 2002 च्या काही कलमांचेही उल्लंघन झाल्याचा दावा संस्थेने केला आहे. (हेही वाचा: Kunal Kamra Controversy: मुंबई उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला अंतरिम दिलासा; अटकेला स्थगिती देत तपास सुरू ठेवण्यास दिली परवानगी)

संस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संस्थेचे (OIPA) मानद वन्यजीव संरक्षक सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी सांगितले की, एका सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाने असे वक्तव्य करणे धक्कादायक आहे, कारण यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि अवैध शिकारीला प्रोत्साहन मिळू शकते. म्हणूनच या मुलाखतीला अपराधाची कबुली मानली पाहिजे आणि छाया कदम आणि मांसासाठी वन्यजीवांच्या शिकारीच्या या गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या इतरांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती संस्थेने केली आहे.