Mee Vasantrao Teaser: वसंतराव देशपांडे यांच्या चरित्रपटाचा टीझर प्रदर्शित; 1 मे रोजी रंगणार सुरांची मैफिल (Video)
Mee Vasantrao Teaser (Photo Credit : Yooutube)

महाराष्ट्राच्या संगीत विश्वाला लाभलेला एक मूल्यवान हिरा म्हणजे वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande). ते हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक तर होतेच, याशिवाय मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेतेही होते. वसंतरावांच्या गायकीने, त्यांच्या आवाजाने महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये फार मोलाची भर घातली. आता डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) दिग्दर्शित 'मी वसंतराव' (Mee Vasantrao) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महत्वाचे म्हणजे वसंतराव देशपांडेचे नातू राहुल देशपांडे (Rahul Deshpande) या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मी वसंतराव टीजर -

हा टीजर जणूकाही वसंतरावांच्या जीवनाचा संगीतमय प्रवासच आहे. टीझरमध्ये देशपांडे यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या संघर्षाची झलक आपल्याला पाहायला मिळते. मुख्यत्वे आपली गायकी आणि त्यावरील प्रेम या टीझरमध्ये दिसून येते. वसंतराव देशपांडे यांच्या गायनाच्या विविध छटाही या टीझरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट जणू काही वसंतराव देशपांडे यांचे जीवनचरित्र समजून घेण्यासोबत एक मोठी सुरांची मैफिलच असणार आहे.

शास्त्रीय संगीतामध्ये राहील देशपांडे हे फार मोठे नाव आहे. संगीताची जाण असणारी व्यक्तीच इतकी मोठी भूमिका सकारात आहे, त्यामुळे ही गोष्टही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरू शकते. राहुल देशपांडेसह, अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपूतकर, कौमुदी वालोकर हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. (हेही वाचा: 'Sooryavanshi' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी उशिरा पोहोचलेल्या रणवीर सिंह ची अजय देवगण आणि अक्षय कुमारसह पत्नी दिपिका पादुकोण ने घेतली शाळा, वाचा मजेशीर कमेंट)

वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. जवळजवळ सर्व वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. बंदिश, ठुमरी, नाट्यसंगीत,  शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत अशा सर्वच प्रकारांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे इतक्या मोठ्या कलाकाराचा चरित्रपट सादर करणे हे जणू काही शिवधनुष्य पेलण्यासाराखेच आहे, जे निपुणने करून दाखवले आहे. आता 1 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.