सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्युनंतर, आता नक्की असे का घडले असावे याबाबत कारणीमीमांसा चालू आहे. यामध्ये इंडस्ट्रीमधील घराणेशाही, नेपोटिझम (Nepotism) अशा गोष्टींनी सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडले असावे, असा सूर सोशल मिडियावर उमटत आहे. हा वाद चालू असताना आता मराठी दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्येही घराणेशाही चालते, मक्तेदारी-कंपूशाही चालते असे विधान केले आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्याला आलेले काही अनुभव कथन केले आहेत.
या व्हिडिओ मध्ये ते म्हणतात, ‘इंडस्ट्रीत कोणी नवीन आले असेल, काही चांगले काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचे काम इथेही केले जाते. एखाद्याची कला चांगली असेल, तो उत्तम अभिनेता असेल आणि अनेक वर्षे काम करत असेल, तरीही त्याला संपवण्याचा घाट इथलीच काही मंडळी करत असतात. हे सर्व करणारी ही मंडळी स्वत:ला अतिशहाणे, अतिविद्वान समजतात. त्यांना वाटते की मराठी चित्रपट सृष्टी ही त्यांच्यामुळेच चालले. मात्र असे काही नाही, ही मंडळी चुकीच्या भ्रमात आहेत.'
पहा व्हिडिओ -
'इथे नेहमीच आपापल्या लोकांना कसे पुढे नेता येईल हे पहिले जाते, मात्र जर का कोणी खरच चांगला कलाकार असेल त्याला मुद्दाम मागे टाकले जाते. समोरून हे वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्र हलवली जातात. मलाही अनेकांनी आव्हान दिले होते की, मला इंडस्ट्रीमधून बाहेर काढले जाईल, मात्र मी या सर्व गोष्टींचा सामना करीत त्यांना धडा शिकविला. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर हे लोक तुमचे मानसिक खच्चीकरण करतील.’ पुढे ते म्हणतात, ’गेली अनेक वर्षे मी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे मात्र कोणीही माझ्या कामाचे कौतुक केले नाही. इथे ठराविक लोकांचीच चमचेगीरी केली जाते, मग भलेही त्यांच्या फिल्म्स कितीही वाईट असोत. इथेही लोकांचे गट आहेत, लोकांची टोळकी आहेत व हे लोक आपलाच कलाकार कसा मोठा होईल हेच पाहत असतात.’ (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईचे सलमान खान वर गंभीर आरोप; पहा व्हिडिओ)
'या लोकांचे सिनेमे जेव्हा रिलीज होतात, त्याआधी हे लोक अनाथाश्रमात जातात, खोटे अश्रू गाळतात व नंतर याच्या बातम्या होतात. मात्र माझा ‘मराठी तारका’ हा शो आम्ही 18 हजार फुट उंचीवर केला तेव्हा कोणीही चार कौतुकाचे शब्द काढले नाहीत. इंडस्ट्रीमध्ये फक्त 20 टक्केच लोक चांगले आहेत. टीव्हीमध्येही अनेकांची पत्ते कट केले जातात. इथले खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे दात वेगळे आहेत. मात्र अशा कोणत्याही गोष्टींचा माझ्या मनावर मी परिणाम होऊ दिला नाही. या सर्वाना मी पुरून उरलो आहे.' अशा प्रकारे महेश टिळेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्येही कसा दुजाभाव होतो हे सांगितले आहे.