क्रांती रेडकर (Photo credit : Youtube)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे  (Sameer Wankhede) याआधी अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. आता ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याने पुन्हा एकदा ते प्रकाशझोतात आले आहेत. वानखेडे यांची तडफ पाहून सर्वजणच त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. अनेकांना हे माहित नसेल की, अभिनेत्री क्रांती रेडकर  (Kranti Redkar) ही समीर वानखेडे यांची पत्नी आहे. क्रांतीला आपण अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये पाहिले आहे. ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे तर क्रांती रातोरात स्टार झाली होती.

क्रांती रेडकर-वानखेडेचा जन्म मुंबईमध्ये 17 ऑगस्ट 1982 रोजी झाला. सध्या ती 39 वर्षांची आहे. क्रांती मुंबईमध्येच लहानाची मोठी झाली. तिने कार्डिनल ग्रेसियस हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर रामनारायण रुईया महाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर क्रांती अभिनय क्षेत्राकडे वळली. 2000 साली आलेल्या 'सून असावी अशी’ या चित्रपटामधून क्रांतीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तिने अजय देवगणच्या 'गंगाजल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

पुढे तिने जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल्ल 3 धमाल, शिक्षणाच्या आईचा घो, लाडी गोडी, ऑन ड्युटी 24 तास, शहाणपण देगा देवा, फक्त लढा म्हणा, नो एन्ट्री पुढे धोका आहे अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. 2015 साली तिने ‘पिपाणी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.

2017 मध्ये समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर वानखेडे यांचे लग्न झाले. या जोडप्याला जुळ्या मुली आहेत. क्रांती सोशल मिडियावर फारच सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 3 लाख 19 हजार फॉलोअर्स आहेत. आजकाल क्रांती इन्स्टावर विनोदी तिच्या रील्समुळे चर्चेत आहे.

याआधी समीरबद्दल बोलताना क्रांती म्हणाली होती की, ‘समीर पहिल्यापासूनच खूप मेहनती आहे. आता बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणांमुळे तो चर्चेत आहे. मी त्यांना काम करण्याची पूर्ण स्पेस देते. घराची सर्व काळजी मी घेते जेणेकरून ते त्यांच्या कामावर लक्ष देऊ शकतील. कधीकधी ते इतके व्यस्त असतात की ते 24/7 काम करतात. अनेकदा ते अवघे 2 तास झोपले आहेत. जेव्हा ते फोनवर बोलत असतात तेव्हाही मी त्यांना डिस्टर्ब करत नाही.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांना एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये दीपिका पदुकोण, रकुलप्रीत सिंग, श्रद्धा कपूरसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. दुसरीकडे, समीर वानखेडे यांच्या टीममुळे रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात 1 महिना तुरुंगात राहावे लागले.