'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटातून रुपाली चाकणकरांचा मुलगा अभिनेता सोहम चाकणकर करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. निखळ प्रेमासोबत जर मैत्रीही जोपासली तर आयुष्य अगदी खुलून जात, मात्र समाजातल्या काही अघोरी कृत्यांमुळे काहींना आपलं प्रेम गमवाव लागत अशाच काहीशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात उत्तम समतोल साधत अभिनेता सोहम चाकणकर (Soham Chakankar) सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा मुलगा सोहम चाकणकर मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू करत आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात कायम पाठीशी राहणाऱ्या रुपाली चाकणकरांचा मुलगा या चित्रपटात विशेष भूमिकेत आहे. निर्माते - राजू तोड़साम, ऋषभ कोठारी व सागर जैन निर्मित - जैन फिल्म प्रोडक्शन आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटातून सोहम प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

या चित्रपटाची कथा रोमँटिक असून सोहम या चित्रपटात गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारणार आहे. शिवाय सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहमसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेण्यात आले आहे. सोहम चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल बोलताना असे म्हणाला की, अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मला आमच्या चित्रपटाचे निर्माते सागर जैन यांनी दिली, आणि दिग्दर्शक कपिल सरांनी मला दिलेलं प्रोत्साहन यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. शूटिंगला आल्यानंतर मला आमच्या टीमने खूप सपोर्ट केल ज्यामुळे मला एकदाही मी या क्षेत्रात नवीन आहे याची जाणीव भासली नाही. मला कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरेच काही नव्याने शिकता आले, आणि माझा अभिनयाबाबतीतचा रस वाढत गेला, 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटाची कथा रोमँटिक आणि फ्रेश असल्याने काम करायला मज्जा आली. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे. (हे देखील वाचा: Ek Hota Malin: माळीण दुर्घटनेचा थरार आता पाहायला मिळणार मोठ्या पडद्यावर)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू आहे याबाबत बोलताना त्या असे म्हणाल्या की, सर्वप्रथम मी असं सांगेन की सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः त्याच श्रेय आहे, माझा यात काहीच वाटा नाही उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले, माझ्यासाठी खरच अत्यंत आनंदाची बातमी आहे, आमच्या कुटुंबात कोणी अद्याप या क्षेत्रात नाही. सोहम वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोहमच्या मागे कायम आहेतच, आणि नक्कीच आशा आहे की, त्याने निवडलेल्या या क्षेत्रात तो त्याचे नाव कमावेल.