प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारी अग्निहोत्र पुन्हा 'स्टार' प्रवाही; दुसऱ्या Season मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Agnihotra | (Picture Credit: Star Pravah)

मराठी मालिकांच्या इतिहासातील काही उत्कृष्ट मालिकांपैकी एक असलेली अग्निहोत्र  (Agnihotra) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह (Star Pravah) ही वाहिनी सुरु झाल्यानंतर तिला प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून देणाऱ्या मालिकांपैकी एक अग्निहोत्र  होती. आता ही मालिका आपला दुसरा सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे.

अग्निहोत्रचा आशय, विषय आणि मांडणी अत्यंत वेगळ्या स्वरूपाची होती. एक जुना वाडा, ताणलेले नातेसंबंध आणि आठ गणपती या तिन्ही गोष्टींना गुंफणाऱ्या तीन पिढयांच्या धाग्यातून स्फुरलेली ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. कथेच्या बांधणीमध्येच एक प्रकारचे गूढत्व होते. या  मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळाली होती. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वाचे लेखक श्रीरंग गोडबोले होते. तर दिग्दर्शन स्टार प्रवाहाचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी केले होते. या पर्वाची धुरा सुद्धा या दोघांच्याच खांद्यावर आहे. (हेही वाचा. अग्गंबाई..सासूबाई या मालिकेमधील मधील 'मॅडी' आहे हिंदी आणि मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची बायको)

ही मालिका नोव्हेंबर महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालकिकेच्या कथानकाबद्दल अजून तितकीशी माहिती नसली तरीही मालिकेची कथा नाशिक मधल्या पूर्वापार उभा असलेल्या वाड्याभोवती फिरणारी असून या मालिकेतही अग्निहोत्रींचा गूढ शोध सुरूच राहणार आहे. तसेच या मालिकेतील कलाकारांबद्दल पूर्ण माहिती नसली तरीही आधीच्या मालिकेतल्या पात्रांशी त्यांचा काही ना काही संबंध नक्कीच असेल असा अंदाज आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीच्या आणि प्रेक्षकांच्या मनातील मालिकेंच्या घसरलेल्या दर्जाबाबाबतच्या खंताला छेद देणाऱ्या या मालिकेचा हा सीजन सुद्धा प्रेक्षकांना भावतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.