Rupert Murdoch Set to Marry at 92: प्रेमाला वयाचे बंधन नसते, हे मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक (Keith Rupert Murdoch) यांनी सिद्ध केले आहे. रुपर्ट मर्डोक वयाच्या 92 व्या वर्षी लग्न करणार आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी त्यांनी याबाबत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, ते जूनमध्ये त्यांची गर्लफ्रेंड एलेना झुकोवासोबत (Elena Zhukova) लग्न करण्याचा विचार करत आहे. रुपर्ट यांचे हे पाचवे लग्न असणार आहे. याआधी त्यांनी चार लग्ने केली होती. गेल्या एप्रिलमध्ये मर्डोक आणि एलेना यांच्या नात्याची बातमी समोर आली होती. ही बातमी येण्याच्या अवघ्या चार महिन्यांपूर्वी, मर्डोक यांनी रेडिओ होस्ट ॲन लेस्ली स्मिथसोबत त्यांचे नाते तोडले होते.
कीथ रुपर्ट मर्डोक यांचा जन्म 11 मार्च 1931 मध्ये मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झाला. ते जगातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मर्डोक यांना संचार-माध्यमाचा सम्राट असे संबोधले जाते. न्यूझ कॉर्पोरेशन या प्रसार-माध्यम कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. जगभरातील अनेक दुरचित्रवाणी वाहिन्या व वृत्तपत्रे न्यूझ कॉर्पोरेशनच्या मालकीची आहेत. रुपर्ट हे जगातील 132 वे श्रीमंत उद्योगपती आहेत. सध्या ते न्यू यॉर्क शहरात राहतात.
टाईम्सच्या वृत्तानुसार, मर्डोकच्या प्रतिनिधीचा हवाला देत म्हटले आहे की, कॅलिफोर्नियातील त्यांच्या मोरागा व्हाइनयार्डमध्ये त्यांचे हे पाचवे लग्न होणार आहे. यासंबंधीची निमंत्रणे यापूर्वीच पाठवण्यात आली आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, झुकोवा ही मॉस्कोची रहिवासी आहे व ती 67 वर्षांची आहे. ती एक निवृत्त आण्विक जीवशास्त्रज्ञ आहे. मर्डोक यांनी मागील उन्हाळ्यात झुकोव्हाला डेट करायला सुरुवात केली. डेली मेलच्या वृत्तानुसार, त्यांची भेट मर्डोकची तिसरी पत्नी वेंडी डेंगच्या माध्यमातून झाली.
मर्डोक आणि झुकोवा हे वेंडी डेंग यांनी आयोजित केलेल्या एका मोठ्या कौटुंबिक मेळाव्यात भेटले होते. जवळजवळ 14 वर्षांच्या नात्यानंतर 2013 मध्ये रुपर्ट यांनी त्यांची तिसरी पत्नी वेंडी डेंगला घटस्फोट दिला होता. मर्डोकचा अलीकडेच अभिनेत्री आणि मॉडेल जेरी हॉलपासून घटस्फोट झाला आहे. ती त्यांची चौथी पत्नी होती. त्यांचे हे सहा वर्षांचे लग्न 2022 मध्ये संपुष्टात आले. मर्डोक आणि त्यांची दुसरी पत्नी, अना टॉर्व्ह (Anna Torv) हे 30 वर्षांहून अधिक काळ एकत्र होते. त्यांनी 1999 मध्ये घटस्फोट घेतला.
रुपर्ट यांचे पहिले लग्न हे 1956 मध्ये फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकरशी झाले होते. ती ऑस्ट्रेलियन नागरिक होती. त्यांचे लग्न 1967 मध्ये संपुष्टात आले. पुढे 2000 मध्ये पॅट्रिशियाचा मृत्यू झाला. मर्डोक यांना एकूण सहा मुले आहेत, मर्डोक यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये आपल्या जागतिक मीडिया साम्राज्याचे नियंत्रण मुलगा लचलानकडे (Lachlan) सोपवले होते.