Theater | Representational image (Photo Credits: pxhere)

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सांगली येथे होऊ घातलेले हे नाट्य संमेलन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ (MLA Sudhir Gadgil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संमेलनाला पुन्हा एकदा नवा अध्यक्ष आणि मुहूर्त शोधावा लागणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या पाच तारखेला सांगली येथे संमनेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र, आयत्या वेळी स्वागताध्यक्षांचाच राजीनामा आल्याने मुहूर्तमेढ लांंबणीवर पडली आहे. सांगितले जात आहे की, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर उसळले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निदर्शने सुरु आहेत. काही ठिकाणी जमाव प्रक्षुब्ध होऊन जाळपोळीच्या घटनाही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर संमेलनाचा मुहूर्त काही काळ लांबणीवर टाकावा असा आयोजकांचा विचार होता. परिणामी मध्यवर्ती संयोजन समितीने तो निर्णयही घेतल्याचे समजते. तथापि, सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिर प्रांगणात संमनेलनाचा मंडप उभारण्याचा मुहूर्त आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वीच स्वागताध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. सहाजिकच एकूण सोहळाही पुढे ढकलण्यात आला. संमनेलनाचे यंदाचे हे 100 वे वर्ष होते. त्यामुळे 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन विभागीय स्तरावर पार पाडण्याचा आयोजकांचा मानस आहे. त्यासाठी हे संमेलन विभागीय स्तरावर पार पडाले जाणार आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे समाजमाध्यमांवरुन जाहीर केले होते. त्यांनी म्हटले आहे की, राज्यभर सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला यापूर्वची पाठिंबा दर्शवला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी स्वागताध्यक्ष पद भूषवणे योग्य वाटत नाही. आपण मराठा बांधवांसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे मराठी नाट्यपरंपरेला चालना देण्यासाठी आणि जतन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि मराठी नाटक आणि कला सादरीकरणाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतातील मराठी भाषिक प्रदेशांमध्ये हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 1923 मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाले. तेव्हापासून, मराठी रंगभूमीतील विविधता आणि प्रतिभा दाखवण्यासाठी हे एक प्रमुख व्यासपीठ बनले आहे.