महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटाशी सामना करता करता पुनश्च हरिओम म्हणत पुन्हा अनेकांनी कामाला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात सिनेमागृह, नाट्यगृह उघडण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा तिसरी घंटा कधी वाजणार याची प्रतिक्षा रसिक, नाट्यकर्मींना होतीच अखेर त्याची नांदी पुण्यात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhachi Goshta) या धम्माल विनोदी नाटकाने होणार आहे. 12, 13 डिसेंबरला पुण्यात (Pune) त्याचे पहिले प्रयोग होणार आहेत. अभिनेते, निर्माते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. फेसबूक पोस्ट करत ' नाटक अनलॉक, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ 12 व 13 डिसेंबरला पुणे येथे पुनश्च हरिओम' असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची भेट घेतली होती. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, साठे सभागृह या तिन्ही नाट्यगृहांची स्वच्छता मोहीम जोरात सुरू असल्याची माहिती दिली होती. त्याचे काही व्हिडिओ देखील शेअर केले होते. त्यामुळे आता पुण्यात पुन्हा नाट्यप्रयोग लवकरच सुरू होतील अशी रसिकांची आशा होतीच. अखेर ही गोष्ट सत्यामध्ये उतरली आहे. Eka Lagnachi Pudhchi Goshta मराठी नाटकाने रचला Book My Show वर विक्रम, प्रशांत दामलेंनी मानले चाहत्यांचे आभार.
प्रशांत दामले फेसबूक पोस्ट
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’या नाटकामध्ये अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडगोळी मुख्य भूमिकेत आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाची प्रस्तुती झी मराठीची आहे. तर अद्वैत दादरकर या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. ईम्तीयाझ पटेल हे या नाटकाचे मूळ लेखक आहेत.