IPL 2025 Punjab Kings: पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2025 च्या हंगामापूर्वी, पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) मालकांमधील वाद उघडकीस आला आहे पंजाब किंग्जची सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preeti Zinta) एका प्रकरणावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रीती झिंटाने सहमालक मोहित बर्मन विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माहितीनुसार, पंजाब किंग्ज फ्रँचायझीच्या सह-मालक प्रीती झिंटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे की अन्य सह-मालक मोहित बर्मनला Mohit Burman) त्याच्या शेअर्सचा काही भाग दुसऱ्या पक्षाला विकायचा आहे आणि त्याला ते करण्यापासून रोखायचे आहे. त्यामुळे झिंटाने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
मोहित बर्मन यांची सर्वाधिक 48 टक्के हिस्सेदारी
लवाद आणि सामंजस्य कायदा, 1996 च्या कलम 9 अंतर्गत प्रीतीने न्यायालयाकडून अंतरिम उपाय आणि निर्देशांची मागणी केली आहे. केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोहित बर्मन यांची सर्वाधिक 48 टक्के हिस्सेदारी आहे. प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्याकडे केवळ 23-23 टक्के शेअर्स आहेत. तर उर्वरित समभाग चौथा मालक करण पॉल यांच्या नावावर आहेत. बर्मन हे आयुर्वेदिक आणि FMCG कंपनी डाबरचे अध्यक्ष आहेत. तो कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) मधील सेंट लुसिया किंग्जचा संचालक आणि सह-मालक देखील आहे. (हे देखील वाचा: IPL 2025 Mega Expected Auction Date: आयपीएल 2025 मेगा लिलाव होणार या दिवशी? किती खेळाडूंना ठेवता येईल कायम; सर्व तपशील जाणून घ्या एका क्लिकवर)
बर्मन काय म्हणाले?
आता बाब अशी आहे की बर्मन यांना त्यांचे 11.5 टक्के शेअर्स दुसऱ्याला विकायचे आहेत. ज्याचा प्रिती झिंटाने निषेध नोंदवला आहे. पण बर्मन यांना त्यांच्या शेअर्सचा काही भाग कोणाला विकायचा आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. दुसरीकडे बर्मन यांनी शेअर्स विकल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. क्रिकबझमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार बर्मन म्हणाले की, त्यांचे शेअर्स विकण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. बर्मन यांनी शेअर्स विकण्याची योजना करण्यास नकार देऊनही, या विषयावर अनिश्चितता कायम आहे. तर प्रीती आणि वाडिया यांनी यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. पंजाब किंग्ज फ्रँचायझी 2008 पासून आयपीएल खेळत आहे आणि गेल्या 17 वर्षांत त्यांना आयपीएलचे जेतेपद जिंकता आलेले नाही. आयपीएल 2025 पूर्वी, या वर्षाच्या अखेरीस एक मेगा लिलाव देखील होणार आहे. ज्यामध्ये पंजाब किंग्जचे व्यवस्थापन पुन्हा एकदा मजबूत संघ तयार करू इच्छित आहे.