तब्बल चार भाषांमध्ये होणार ‘बधाई हो’चा रिमेक; बोनी कपूर यांनी विकत घेतले सारे हक्क
Badhaai Ho film poster (File Photo)

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2018 हे अतिशय चांगले वर्ष ठरले. हटके विषय, नाविन्यपूर्ण प्रयोग, लो बजेट चित्रपटांचे यश, तीनही खानांना मात देऊन नव्याने उदयास आलेले कलाकार अशा गोष्टींनी ते वर्ष गाजले. 2018 मधील सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बधाई हो’ (Badhaai Ho). अमित शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येऊ घातला आहे, आणि तोही तब्बल 4 भाषांमध्ये. नुकताच क्वीन या चित्रपटाचा रिमेक अशाप्रकारे चार भाषांमध्ये बनला होता.

बधाई हो या चित्रपटाचा रिमेक कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगू या चारही दाक्षिणात्य भाषांमध्ये बनणार आहे. या सर्व चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहेत बोनी कपूर (Boney Kapoor). बोनी कपूर यांनी या चित्रपटाच्या रिमेकचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. याबाबत बोलताना बोनी कपूर म्हणाले, ‘बधाई हो चित्रपट सर्वांनाच आवडेल असा आहे. ‘बधाई हो’चे जगभरात खूप कौतुक झाले. म्हणून आता दक्षिणात्य भाषांमधील हा चित्रपट तुफान चालेल असा माझा विश्वास आहे. मी लवकरच चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार आहे’. (हेही वाचा: तब्बल चार भाषेत प्रदर्शित होणार कंगनाच्या 'क्वीन'चा रिमेक)

आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव यांच्या मुख्य भूमिका असलेला बधाई हो या चित्रपटाने जवळजवळ 200 कोटीचा व्यवसाय केला होता. या सोबतच बोनी कपूर ‘पिंक’ या चित्रपटाचाही रिमेक बनवत आहेत. बोनी कपूर अमित शर्माच्या आगामी चित्रपटाची निर्मिती करत आहेत, या चित्रपटात अजय देवगन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सईद अब्दुल रहीमचा बायोपिक असणार आहे.