Web Series on Nirav Modi: फरार हिरे व्यापारी निरव मोदीवर बनत आहे भव्य वेब सिरीज; दिसणार यशापासून ते घोटाळयापर्यंतचा प्रवास
Nirav Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

याआधी शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहतावर 'स्कॅम 1992' ही सिरीज आली होती. आता फरार हिरे व्यापारी नीरव मोदीवर वेब मालिका बनवली जात आहे. यामध्ये नीरवला यश मिळाल्यापासून ते तो फरार घोषित होण्यापर्यंतची कथा दाखवली जाईल. पंजाब नॅशनल बँकेची 14,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या निरव मोदीवर पत्रकार पवन सी लाल यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव 'फ्लोयड: द राइज अँड फॉल ऑफ इंडियाज डायमंड मोगल नीरव मोदी' (Flawed: The Rise and Fall of India’s Diamond Mogul Nirav Modi) असे आहे. प्रोडक्शन बॅनर Abundantia Entertainment ने या पुस्तकावर वेब सिरीज बनवण्याचे अधिकार मिळवले आहेत.

फरार घोषित होण्याआधी नीरव मोदी हा देशातील सर्वात मोठा हिरे व्यापारी होता. सध्या या सिरीजची पटकथा लिहिण्याचे काम सुरू आहे. पत्रकार पवन सी लाल यांनी मुलाखती आणि संशोधनाच्या आधारे आपले पुस्तक लिहिले आहे व या सिरीजच्या स्क्रिप्टसाठी ते सल्लागार लेखक म्हणून काम करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लेखक पवन सी.लाल हे सिरीजबाबत अतिशय उत्सुक आहेत या पुस्तकात नीरवने यशाचे पायऱ्या कशा चढल्या ते सविस्तर सांगितले आहे. त्यानंतर 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळयाबाबतही सविस्तर माहिती आहे. (हेही वाचा: KBC 13: गोलकीपर PR Sreejesh समोर अमिताभ बच्चन यांचा हॉकीचा खेळ; पहा मजेशीर व्हिडिओ)

लेखक पवन सी.लाल म्हणाले की, 'पुस्तकाचे चित्रपटामध्ये रुपांतर करणे हे सोपे काम नाही, परंतु Abundantia Entertainment  या प्रयत्नाला न्याय देईल याची मला खात्री आहे.' Abundantia Entertainment ने यापूर्वी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीज तयार केल्या आहेत, ज्यामध्ये बेबी, एअरलिफ्ट, टॉयलेट एक प्रेम कथा, शकुंतला देवी, शेफ आणि ब्रेथ इ. चा समावेश आहे. आता बनत असलेली ही सिरीज अनेक सिझन्समध्ये पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे.