Violence in JNU: जेएनयूमधील हल्ल्यावर सोनम कपूरने दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली हिंमत असेल तुमचे चेहरे दाखवा
Sonam Kapoor (Photo Credits-Twitter)

Violence in JNU: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आइशी घोष यांना विद्यापीठाच्या आवारात अज्ञात जमावाने मारहाण केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून सर्वच स्तरातून याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. मास्कधारी अज्ञातांनी घोष यांच्यावर हल्ला करुन त्यांना जबर मारहाण केली आहे. हा एक प्रकारचा भ्याड हल्ला असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्री सोनम कपूर हिनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. "जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल मला धक्का बसला. विद्यार्थ्यांनी पाशवी हल्ले केले. पोलिसांनी तातडीने हिंसाचार रोखून शांतता प्रस्थापित केली. जर आमचे विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होईल?" असा सवाल त्यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटला उत्तर देत, सोनम कपूर यांनी देखील JNU मध्ये घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. हा हल्ल्याबाबत सोनम लिहिते, "धक्कादायक आणि घृणास्पद. जेव्हा आपण निर्दोषांवर आक्रमण करू इच्छित असाल तर आपला चेहरा कमीतकमी दर्शविण्यासाठी हिम्मत ठेवा."

JNU मध्ये हिंसाचार: मॉबने कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला, JNUSU चे अध्यक्ष आइशी घोष गंभीर जखमी; स्टुडंट युनियनने एबीव्हीपीला ठरवले दोषी

दरम्यान, जवळपास 50 लोकांच्या मास्कधारी अज्ञात जमावाने विद्यापीठाच्या परिसरात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या जमावाने वसतिगृहांची तोडफोड देखील केली. घोष यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मास्क घातलेल्या लोकांनी तिच्यावर पाशवी हल्ला केला होता. ती पुढे म्हणाली, “मी आत्ता बोलण्याच्या स्थितीत नाही. मला निर्घृणपणे मारहाण केली आहे.”