KD Chandran Passes Away: अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
KD Chandran (PC - YouTube)

KD Chandran Passes Away: मनोरंजन क्षेत्रातू अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudha Chandran) यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन (KD Chandran) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सुधा चंद्रन यांनी यासंदर्भात वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 86 व्या वर्षी के.डी.चंद्रन यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाचं त्यांचा मृत्यू झाला.

तसेच सुधा चंद्रन यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील के. डी. चंद्रन यांची प्रकृती चांगली नव्हती. 12 मे रोजी त्यांना जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिमेंशिया किंवा स्मृतिभ्रंश झाला होता. के.डी.चंद्रन यांच्यावर रुग्णालयातील सर्वोत्तम डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. (वाचा - Gangubai Kathiawadi च्या निर्मात्याला दररोज सहन करावे लागत आहे 3 लाख रुपयांचे नुकसान; काय आहे नेमकी या मागचं कारण, जाणून घ्या)

के.डी.चंद्रन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. कोई मिल मिला, चायना गेट, कॉल, हम हैं राही प्यार के, तेरे मेरे सपने, जुनून, हर दिल जो प्यार करेगा, शरारत, मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हू आदी चित्रपटांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटांमध्ये काम करून केडी चंद्रन यांनी लोकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली. चित्रपटांशिवाय केडी अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसले होते.

दरम्यान, केडी चंद्रन यांची मुलगी सुधा एक कलाकार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तिचे नाव आहे. सुधा चंद्रन तिच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाते. नागीन मालिकेत तिने यामिनीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुधा चंद्रन यांनी टीव्हीशिवाय अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुधा एक उत्कृष्ट अभिनेत्री तसेच उत्तम शास्त्रीय नर्तक आहे.