स्क्रीनरायटर असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्कारांची (SWA Awards) जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झाली असून, चाहत्यांना लवकरच हा सोहळा पाहायला मिळणार आहे. चित्रपटसृष्टीतील गीतकार आणि लेखकांच्या (Screenwriters and Lyricists) सन्मानार्थ आयोजित केलेला हा एकमेव पुरस्कार सोहळा आहे. स्क्रीनरायटर असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्कारांचे दुसरे एडिशन 27 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक समजला जाणारा, SWA पुरस्कार हा देशातील एकमेव पुरस्कार आहे जो हिंदी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन शो आणि वेब सिरीजचे पटकथा लेखक आणि गीतकारांना समर्पित आहे.
अशाप्रकारे, बॉक्स ऑफिस कलेक्शन, स्टार पॉवर, टीआरपी आणि लोकप्रियता यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, SWA पुरस्कार पटकथा आणि लेखन कौशल्यांवर अधिक भर देतो. या पुरस्कारांच्याबाबत प्रख्यात पटकथालेखकांच्या ज्यूरीद्वारे निर्णय घेतले जात असल्याने, SWA पुरस्कार हे भारतातील लेखकांसाठी सर्वात प्रतिष्ठित मानले जातात. 2020 (1 जानेवारी 2020 - 31 डिसेंबर 2020) मध्ये प्रकाशित झालेल्या लेखन कार्यासाठी 15 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट लेखनाला पुरस्कार देण्यात आले होते.
यावर्षी, विविध श्रेणींमध्ये प्राप्त झालेल्या प्रवेशांमध्ये फीचर फिल्म (92), गाणी (101), वेब सिरीज (46) आणि टेलिव्हिजन (96) यांचा समावेश आहे. प्रक्रियेत सहभागी लेखकांची एकूण संख्या जवळपास 600 आहे. थोडक्यात, SWA पुरस्कार 'लेखकांद्वारे आणि लेखकांसाठी' आहेत. SWA पुरस्कारांच्या नवीन एडिशनवर भाष्य करताना, रॉबिन भट्ट- अध्यक्ष, SWA म्हणतात, ‘आम्ही या कठीण काळातही विश्वासार्ह आणि प्रतिभावान पुरस्कार देऊन आमचे वचन पूर्ण केले आहे, जिथे 20 वर्षांच्या नवीन तसेच 60 वर्षांच्या अनुभवी लेखकालाही पुरस्कार प्राप्त करण्याची संधी आहे.
2021 च्या पुरस्कार उपसमितीच्या अध्यक्षा मनीषा कोरडे म्हणतात. ‘ज्यावेळी संपूर्ण जग लॉकडाऊनच्या संकटातून जात होते, तेव्हा लेखकांच्या लेखणीने चमत्कार घडवून आणला आणि त्यांच्या उत्कृष्ट आणि उत्तम कंटेंटच्या बळावर जगाला चित्रपट कथा, वेब सिरीज अशा अनेक भेटवस्तू दिल्या. म्हणूनच अशा या लेखनातील जादूगारांना सलाम करण्याची वेळ आली आहे.’
SWA पुरस्कार सोहळा 2021 हा 27 फेब्रुवारी 2022 रोजी SWA च्या YouTube चॅनेल आणि फेसबुक पेजवर थेट प्रवाहित केला जाईल. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद किरकिरे आणि टिस्का चोप्रा करणार आहेत.