बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येच्या बातमीने, केवळ बॉलिवूडच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे व आता बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीवर ताशेरे ओढले जात आहेत. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur) आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. शनिवारी मुजफ्फरपूर सदर पोलिस ठाण्याच्या पताही येथील कुंदन कुमार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. ज्यामध्ये रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
नवभारत टाईम्सशी बोलताना कुंदन कुमार यांनी आरोप केला आहे की, रिया चक्रवर्तीने एका षडयंत्रांतर्गत सुशांतसिंह राजपूतला आपल्या प्रेमात अडकवले आणि नंतर त्याच्याकडून अनेक प्रकारची मदत घेतली. सुशांतसिंह राजपूतचे आपल्या कुटुंबीयांशी स्वतःच्या लग्नाबद्दलही बोलणे झाले होते, परंतु त्यादरम्यान रियाने सुशांतशी असलेले सर्व संबंध संपवले. आता कलम 420 आणि 306 अन्वये दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी 24 जून रोजी होईल. याआधी बिहार येथे सलमान खान, आदित्य चोप्रा, करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि एकता कपूर यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: ‘बॉलिवूड मध्ये दादागिरी खपवून घेणार नाही, अन्याय होणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी आम्ही उभे'; वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांचे आश्वासन)
सुशांत सिंहच्या कारकीर्दीत अडथळे निर्माण केल्याचा आरोप बॉलिवूड इंडस्ट्रीच्या या बड्या लोकांवर आहे. आता रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतचा मानसिक ताणतणाव आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. दरम्यान याआधी 18 जून रोजी वांद्रे पोलीस स्थानकात सुशांतच्या मृत्यूबाबत रियाची चौकशी करण्यात आली होती. पोलिसांना सुशांत सिंह राजपूत याच्या घरातून 5 डायऱ्या मिळाल्या आहेत. यावरुन पोलीस त्याच्या आयुष्याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच सुशांत याचा मॅनेजर सिद्धार्थ पिठानी याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे.