Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता यांना बजावले समन्स
Apoorva Mehta (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) कसून चौकशी करत आहेत. यासंदर्भात नवीन माहिती समोर आली असून मुंबई पोलिसांनी धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता (Apoorva Mehta, CEO of Dharma Productions) यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी अपूर्व मेहता यांना 27 जुलै रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवायला सांगितले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अपूर्व मेहता आणि महेश भट्ट यांची चौकशी केली जाणार असल्याचे म्हणाले होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवले होते. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला होता. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमके कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आले होते का? अशा प्रशांची उत्तरे सध्या मुंबई पोलीस शोधत आहेत. हे देखील वाचा-Sushant Singh Rajput case: कंगना रौनौत हिला समन्स, महेश भट्ट, करण जौहर यांच्या मॅनेजर्सची होणार चौकशी- अनिल देशमुख

एएनआयचे ट्वीट-

सुशातच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 37 लोकांची चौकशी केल्याची समजत आहे. यात आदित्य चोपडा, संजय लीला भंसाली, रिया चक्रवर्ती यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी करत आहेत. परंतु, सुशांतच्या आमहत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे अनिल देशमुख म्हणाले होते.