नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजईचा जीवनपट उलगडणारा चित्रपट 'गुल मकई'चा प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
Malala Yousafzai's Biopic Gul Makai (PC - Twitter)

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांच्या निर्मीतीचे प्रमाण वाढले आहे. आता या बायोपिक यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. कारण, नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजईचा (Malala Yousafzai's Biopic) जीवनपट उलगडणारा चित्रपट 'गुल मकई'चा (Gul Makai) प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 31 जानेवारी, 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमजद खान यांनी केलं असून संजय सिंगला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे जास्तीत-जास्त चित्रिकरण काश्मिरमध्ये करण्यात आलं आहे.

या चित्रपटात मलाला युसूफजई हिची व्यक्तीरेखा रीम शेख ही अभिनेत्री साकरणार आहे. 'गुल मकई' चित्रपटात दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी, दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषी आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपट दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची महत्त्वाची भूमिका आहे. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित होणारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडवरुन याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा - कंगना रनौत कमाईमुळे नाखुश असल्याचा खोटा दावा केल्याने बहिण रंगोली हिच्याकडून Forbes India यांना नोटिस)

'गुल मकई' चित्रपटात मलालाचा साहसी प्रवास आणि संघर्ष दाखवण्यात आला आहे. मलालाने महिलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. तालिबान या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या पायमल्ली घालण्यात येत असल्याचा प्रकारही तिने जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. 2012 मध्ये शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर 3 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये मलाला गंभीर जखमी झाली होती. मलालावर झालेल्या या हल्ल्याचा जगभरात तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्यानंतरही मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - Good Newwz चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली 'एवढ्या' रुपयांची कमाई

2014 मध्ये मलालाला शांतता नोबेल पुरस्कार मिळाला. वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला जगातील सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती ठरली. मलालाने पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना तीव्र विरोध केला. पाकिस्तानामधील परिस्थितीचे चित्रण करण्यासाठी तिने एका वर्तमानपत्रात 'गुल मकई' नावाने डायरी लिहिली होती. मलालाच्या या संघर्षमयी जीवनावर आधारित 'गुल मकई' हा चित्रपटात प्रेक्षकांना पुढील महिन्यात पाहता येणार आहे.