कंगना रनौत (Photo Credits-Facebook)

आज अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिचा महाराष्ट्र सरकारसोबत असलेला वाद आता आणखीन चिघळला जाण्याची शक्यता आहे. कंगना मुंबईत येण्याआधीच बीएमसीने (BMC) तिच्या वांद्रे येथील पाली हिल येथे असलेल्या कार्यालयातील काही भाग तोडला. या गोष्टीचे व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अशात कंगनाच्या खार येथील घरावरही बीमएमसीचा हातोडा पडण्याची शक्यता आहे. याबाबत कंगनाने ट्वीट करत माहिती दिली आहे. एका ट्वीटमध्ये कंगना म्हणते, ‘मला धमक्या मिळत आहेत की ते माझ्या घरी येतील आणि तेही तोडतील.’

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये कंगना रनौत म्हणते, ‘गेल्या 24 तासात अचानक माझ्या कार्यालयाला बेकायदेशीर घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी फर्निचर व दिवे यासह सर्व काही नष्ट केले आहे आणि आता मला धमकावले जात आहे की, ते माझ्या घरी येतील आणि तेही तोडून टाकतील. चित्रपट माफियांच्या आवडत्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या माझ्या मताचा मला आनंद आहे.’

कंगना रनौत ट्वीट -

याआधी कंगनाने मुंबईचा ‘पाकिस्तान व्याप्त भारत’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले. अनेक नेत्यांनी कंगनावर टीका केली होती. आता आज कंगना मुंबईत दाखल झाली, मात्र त्याआधीच बीएमसीने तिच्या कार्यालयाचा काही भाग तोडून टाकला. कंगनाने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, कोर्टाच्या आदेशानंतर हे काम थांबवण्यात आले. त्यानंतर कंगनाच्या घरावरही बीएमसी कारवाई करण्याची शक्यता आहे. बीएमसीने कंगनाच्या खार परिसरातील फ्लॅटमधील काही भाग पाडण्यासाठी परवानगी मागितली आहे. (हेही वाचा: 'आज माझे घर तुटले आहे, पण उद्धव ठाकरे उद्या तुझा अहंकार तुटेल'; अभिनेत्री कंगना रनौतने व्यक्त केली प्रतिक्रिया)

दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतला नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये म्हटले होते की, हे घर चुकीच्या पद्धतीने बदलले गेले आहे व यामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेले आहे. त्यावेळी कंगना रनौतने सीटी दिवाणी न्यायालयात जाऊन स्थगितीचा आदेश घेतला. आता हा स्थगिती आदेश रद्द करावा आणि आम्हाला अनधिकृत बांधकाम पडण्याची परवानगी देण्यात यावी, असे बीएमसीने म्हटले आहे. खार परिसरातील डीबी ब्रिज नावाच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगना रनौतचे घर आहे. त्यात आठ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत.