प्रियंका चोप्रा (Photo Credits : Instagram)

देशातील कृषी कायद्याचा (Farm Laws) निषेध करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या आसपासच्या भागात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करूनच घ्यायच्या या मतावर ते ठाम आहेत. या आंदोलनाचे लोण परदेशातही पोहोचले आहेत. अशात अनेक सामान्य नागरिकांसह चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनीही या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे. याआधी दिलजीत दोसांझ ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असलेला दिसून आला होता, आता या यादीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिचेही नाव जोडले गेले आहे.

हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा या दिवसांत देशाबाहेर राहत आहे, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती भारतातल्या विषयांवर नेहमीच प्रतिक्रिया देताना दिसत आहे. आता तिने किसान आंदोलनाबाबत एका ट्विटमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. प्रियंका चोप्राने दिलजित दोसांझ याचे ट्विट रीट्वीट करत लिहिले की, 'आमचे शेतकरी भारतातील अन्नाचे  सैनिक आहेत. त्यांची भीती घालवण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची गरज आहे. एक संपन्न लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की, लवकरात लवकर हे संकट सोडवले जाईल.’

दिलजितने आपल्या ट्विटमध्ये सिंघू सीमेवरील काही छायाचित्रे शेअर केली आहेत आणि लिहिले आहे की, 'प्रेमाने बोला, कोणताही धर्म लढण्यास शिकवत नाही. हिंदू-शीख-मुस्लिम-ईसाई-जैनी-बोधि सर्वजण एकमेकांसाठी आहेत.’ हेच ट्वीट शेअर करत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रियंकाने दाखवून दिले आहे. अशात काल दिलजितने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 कोटीची मदत जाहीर केली आहे, जेणेकरून हे शेतकरी स्वतःसाठी गरम कपडे घेऊ शकतील.

बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांचे अनेक सेलेब्ज शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. रितेश देशमुख, सोनू सूद, गुरदास मान, गिप्पी ग्रेवाल, हनी सिंग, कपिल शर्मा, स्वरा भास्कर, वीर दास, तापसी पन्नू, सोनम कपूर यांच्यासह अनेक स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत.

दरम्यान, सध्या शेतकरी चळवळ हा देशातील सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. शेतकर्‍यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि राष्ट्रीय राजधानीत येणारे आणखी मार्ग अडविण्यात येतील असा इशारा दिला आहे.