
बॉलिवूडमध्ये काम करणारे तीन प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स मनीष मल्होत्रा (Manish Malhotra), सब्यसाची (Sabyasachi) आणि रितु कुमार (Ritu Kumar) यांची नावे सध्या चर्चेत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी या तिघांना नोटिसा पाठविल्या आहेत. पंजाबच्या नेत्याकडून लाखो रुपये बेकायदेशीरपणे घेण्याबाबतचे हे प्रकरण आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ईडी मुख्यालयात या तिन्ही फॅशन डिझायनर्सना वेगवेगळ्या तारखांवर चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. पंजाबच्या आमदाराने या तिघांना अवैधरीत्या लाखो रुपये रोख दिले होते, व सध्या इन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्याच प्रकरणाचा तपास करत आहे.
या अवैध व्यवहारात पंजाबच्या ज्या आमदाराचे नाव समोर आले आहे, त्याच्याकडेही ईडी विचारणा करत आहे. ईडीने या आमदारावर मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान या तिघांची नावे समोर आली आहेत. या आमदाराच्या बँक खात्यांच्या तपासणी दरम्यान काही व्यवहार उघडकीस आले, त्यानंतर ईडीने तिन्ही फॅशन डिझायनर्सना समन्स बजावले आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी आमदाराकडे एक मोठे लग्न पार पडले होते, ज्यासाठी मनीष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितू कुमार यांच्याकडून डिझायनर कपडे खरेदी केले गेले. लाखो किंमतीचे हे कपडे रोख रुपये देऊन खरेदी केले गेले. यावरून आयकर चुकवण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या तिन्ही जणांवर आहे. ईडीसह प्राप्तिकर विभागही या तपासात सामील होऊ शकतो असा विश्वास आहे. (हेही वाचा: काय सांगता? बाहुबली फेम अभिनेता Prabhas ने नाकारल्या तब्बल 150 कोटींच्या जाहिराती, जाणून घ्या कारण)
मनीष मल्होत्रा, सब्यसाची मुखर्जी आणि रितू कुमार हे डिझाइनर व त्यांचे कलेक्शन भारतासह इतर देशांमध्येही प्रसिद्ध आहेत. अनेक कॉर्पोरेट लोक आणि बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांनी डिझाइन केलेले कपडे घातले आहेत.