Disney and Reliance to Merge Media Businesses: रिलायन्स आणि डिस्नेने (Reliance and Disney) देशात मनोरंजन ब्रँड तयार करण्यासाठी एक मोठा करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यात हा करार झाला आहे आणि दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, जो वायकॉम 18 आणि स्टार इंडियाच्या व्यवसायाला जोडेल. या भागीदारीअंतर्गत रिलायन्स 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. डिस्ने कंटेंट परवाना प्रदान करेल.
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला या कराराची माहिती दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यात एक संयुक्त उपक्रम तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत, वायकॉम 18 चा मीडिया व्यवसाय स्टॉक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलीन केला जाईल, ज्यासाठी न्यायालयाकडून मंजुरी घेतली जाईल. नीता अंबानी या संयुक्त उपक्रमाच्या अध्यक्ष असतील, तर उदय शंकर उपाध्यक्ष असतील. उदय शंकर हे या संयुक्त उपक्रमासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहेत.
रिलायन्स आपल्या वाढीच्या धोरणांतर्गत या संयुक्त उपक्रमात 11,500 कोटी रुपये म्हणजेच 1.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पोस्ट-मनी आधारावर, या संयुक्त उपक्रमाचे व्यवहार मूल्य अंदाजे 70,352 कोटी रुपये आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त उपक्रमात 16.34 टक्के हिस्सा असेल, तर वायकॉम 18 कडे 46.82 टक्के आणि डिस्नेकडे 36.84 टक्के हिस्सा असेल.
या संयुक्त उपक्रमांतर्गत, कलर्स, स्टारप्लस आणि स्टारगोल्ड यांसारख्या मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या मीडिया कंपन्या एकत्र येतील. तसेच यामुळे स्पोर्ट्स स्टार आणि स्पोर्ट्स 18 एकत्र येतील, यासह यामध्ये जिओ सिनेमा (JioCinema) आणि हॉटस्टार (Hotstar) या डिजिटल प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. या संयुक्त उपक्रमाचे भारतात 75 कोटी प्रेक्षक असतील. (हेही वाचा: Netflix- Indrani Mukerjea and Bombay HC: इंद्राणी मुखर्जी वरील वेब सीरीजचं रीलीज मुंबई उच्च न्यायालयाने रोखलं; स्क्रिनिंगपूर्वी CBI ला दाखवण्याचे आदेश)
या कराराबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, हा एक ऐतिहासिक करार आहे जो भारतीय मनोरंजन उद्योगात नवीन पर्व सुरू करेल. जागतिक स्तरावर सर्वोत्तम मिडिया समूह म्हणून डिस्नेचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. आता आम्ही एकत्रितपणे देशभरातील प्रेक्षकांना परवडणाऱ्या किमतीत चांगला कंटेंट देऊ.