Devi First Look: पहिल्यांदाच काजोल, नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वेसह 9 अभिनेत्री  एकत्र; नऊ महिलांची शोकांतिका सांगणाऱ्या 'देवी' चित्रपटाचा First Look (Photo)
Devi First Look (Photo Credits: File Image)

स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टींचा सामना करावा लागतो. बऱ्याच गोष्टी त्या आपल्या मनात ठेवतात, मात्र त्यांच्या मनात भावनांचा महासागर उसळत असतो याची कोणालाही कल्पना नसते. अशाच 9 महिला जेव्हा एकत्र येतात, काही काळ एकत्र, एकाच खोलीत क्षण व्यतीत करतात तेव्हा एक सशक्त शोकांतिका देशासमोर सादर होते.

याच आशयाची एक नवी शॉर्ट फिल्म, ‘देवी’ (Devi) येऊ घातली आहे, ज्यामध्ये 9 महिला आपली काही लोकांसमोर मांडणार आहेत. या फिल्मद्वारे पहिल्यांदाच काजोल (Kajol), मुक्ता बर्वे (Mukta Barve), नीना कुलकर्णी (Neena Kulkarni) अशा 9 लोकप्रिय अभिनेत्री एकत्र आल्या आहेत.

तान्हाजीच्या यशानंतर काजोल तिच्या नवीन चित्रपटासह सज्ज आहे. होय, ती आता लघुपटांच्या दुनियेत पाऊल टाकणार आहे. या तिच्या पहिल्या चित्रपटाचे ‘देवी’चे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या लघुपटात काजोलसह श्रुती हासन, नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, मुक्ता बावरे, संध्या म्हात्रे, रमा जोशी, शिवानी रघुवंशी आणि यशस्विनी दयामा या अभिनेत्री आहेत. हा चित्रपट एका खोलीत राहणाऱ्या 9 महिलांची एक कथा आहे. (हेही वाचा: सहा दिवसात अजय देवगणचा 'तान्हाजी' चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील; जाणून घ्या एकूण कमाई)

Devi Poster:

या लघुपटाच्या पोस्टरमध्ये तुम्ही सर्व पात्रांना एकत्र पाहू शकता ज्यामध्ये काजोल सर्वांच्या मध्यभागी बसली आहे. या पोस्टरमध्ये काहींच्या चेहऱ्यावर त्रागा दिसत आहे, तर काहींच्या चेहऱ्यावर राग दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग फक्त दोन दिवसात झाले असून, याची निर्मिती निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी केली आहे. प्रियंका बॅनर्जी यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. काजोलशिवाय श्रुति हासनचाही हा डिजिटल डेब्यू असणार आहे.