Bollywood Drugs Case: एनसीबी चौकशी दरम्यान दीपिका पदुकोण सह रणवीर सिंह राहणार हजर? NCB ने केले स्पष्ट
Deepika Padukone and Ranveer Singh (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास ड्रग्सच्या दिशेने सुरु झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आली. यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे मोठे आणि वलयांकित नावं समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दीपिका पदुकोण हिला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावला आहे, दरम्यान, दीपिका पदुकोण शकुन बत्रा याच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्यात होती. ती काल रात्री मुंबईत परतली. आज दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश ही चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल झाली होती. लवकरच दीपिकाचीही चौकशी करण्यात येईल. चौकशीदरम्यान दीपिकाचा नवरा आणि अभिनेता रणवीर सिंह याने दीपिकासह उपस्थित राहण्याची विनंती एनसीबीला केल्याचे अनेक रिपोर्ट्स समोर आले होते. मात्र रणवीरने अशा प्रकारची कोणतीही विनंती न केल्याचे NCB ने स्पष्ट केले आहे.

PeepingMoon.com च्या पूर्वीच्या रिपोर्ट्सनुसार, एनसीबीकडून होणाऱ्या दीपिकाच्या चौकशीमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, असे पत्र रणवीर सिंह याने NCB ला लिहिले होते. चौकशी दरम्यान दीपिकाला पॅनिक अॅटक येऊ शकतो या भीतीपोटी रणवीरने ही विनंती केली होती. कायद्यानुसार, तो दीपिकासोबत उपस्थित राहू शकत नाही याची कल्पना असूनही दीपिकाच्या काळजीपोटी त्याने ही विनंती केली होती. परंतु, नुकत्याच आलेल्या अपडेट्सनुसार, NCB ला रणवीर सिंह कडून अशा कोणत्याही प्रकारचे पत्र मिळालेले नसल्याचे समोर येत आहे.

यासंदर्भात एनसीबीचे डेप्युटी डिरेक्टर केपीएस मल्होत्रा म्हणाले की, "दीपिकाच्या चौकशीमध्ये रणवीर सिंह सहभागी होईल का याबाबत प्रश्न आहे. एनसीबीने समन्स दिलेल्यांपैकी कोणाकडूनही अशा प्रकराची विनंती करण्यात आलेली नाही. समन्स बजावण्यात आलेल्या व्यक्तींकडून शेवटचा इमेल हा चौकशीसाठी हजर राहण्याबाबतचा आहे."

दरम्यान, ड्रग्स संबंधित चौकशीसाठी दीपिका पादुकोणसह सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर या बॉलिवूड अभिनेत्रींनाही समन्स बजावण्यात आला आहे. आज रकुल प्रीत सिंह चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल झाली. तर उद्या सारा अली खान हिची चौकशी होणार आहे.