उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Photo Credits : IANS)

बॉलिवूडमधील ड्रग अँगलबाबत चालू असलेली देशव्यापी चर्चा आणि महाराष्ट्रात कंगना रनौत व सरकार यांच्यामध्ये चालू असलेल्या गदारोळादरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील सर्वात मोठी व सुंदर फिल्म सिटी (Biggest and Most Beautiful Film City) यूपीमध्ये बनवली जाईल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकात्यांना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यूपीची नवीन फिल्म सिटी नोएडा किंवा ग्रेटर नोएडामध्ये बनवली जाणार आहे. या बातमीनंतर अभिनेत्री कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.

लखनौमध्ये शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्च अधिकाऱ्यांशी बैठक घेताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थितीत देशात एका चांगल्या फिल्म सिटीची आवश्यकता आहे. ही जबाबदारी घ्यायला उत्तर प्रदेश राज्य तयार आहे. येथे एक उत्कृष्ट फिल्म सिटी बनविली जाईल. यामुळे नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्स्प्रेस वेचे क्षेत्र अधिक चांगले होईल. ही फिल्म सिटी शहरातील चित्रपट निर्मात्यांना एक उत्तम पर्याय प्रदान करेल, तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त प्रयत्‍नकेले जातील.’ यासंदर्भात त्यांनी जागेच्या पर्यायांसह लवकरात लवकर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा: Kangana Ranaut ने मुंबई कोर्टात दाखल केलेल्या नुकसान भरपाईच्या याचिकेवर आव्हान देत BMC ने दिले उत्तर, म्हणाली 'कंगनाची याचिका कायदेशीर प्रक्रियेचा अवमान करणारी आहे')

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, ‘योगी आदित्यनाथजी यांनी केलेल्या या घोषणेचे मी कौतुक करते. चित्रपटसृष्टीत आम्हाला बर्‍याच सुधारणांची आवश्यकता आहे. सर्वप्रथम आम्हाला मोठ्या चित्रपटसृष्टीची आवश्यकता आहे, ज्याला आपण भारतीय चित्रपट उद्योग म्हणू शकू. हॉलिवूडलाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे. एक इंडस्ट्री मात्र अनेक फिल्म सिटी.’

पहा कंगना रनौत ट्वीट -

दरम्यान, यूपीमधील फिल्म सिटीची मागणी बर्‍याच दिवसांपासून वाढत आहे. यूपीमधील अनेक चित्रपट कलाकारांपासून इंडस्ट्रीमधील इतर अनेक लोकांमध्ये यूपीमध्ये फिल्म सिटी बांधण्याबाबत वेळोवेळी चर्चा होत आहे. आता योगी आदित्यनाथ यांनी त्याला सत्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.