Kangana Ranaut (Photo Credit - Instagram)

बेंगळुरूचे अभियंते अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे (Suicide) पडसाद सध्या देशभर उमटत आहेत. अतुल हे एआय इंजिनिअर होते आणि बेंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होते. नुकतेच 9 डिसेंबर रोजी त्यांनी 24 पानी सुसाइड नोट आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ बनवून आत्महत्या केली. अतुल सुभाष यांनी पत्नी निकिता सिंघानिया हिच्यावर हुंडा आणि अनैसर्गिक लैंगिक छळाच्या खोट्या केसेसमध्ये आपल्याला गोवल्याचा आरोप केला आहे. आता अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रणौतनेही (Kangana Ranaut) याप्रकरणी भाष्य केले आहे. कंगनाने घडल्या प्रकाराबाबत उघडपणे शोक व्यक्त केला आहे. मात्र तिने पुरुषांवरही गंभीर आरोप केले आहेत.

माध्यमांशी बोलताना तिने सांगितले, ‘या घटनेने मला धक्का बसला आहे आणि मी खूप दुःखी आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे आणि शोकग्रस्त आहे. या तरुणाचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. अर्थात जोपर्यंत लग्न भारतीय परंपरांनी बांधले आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे, पण जेव्हा साम्यवाद, समाजवाद, चुकीच्या स्त्रीवादाचा किडा लग्नात शिरतो, तेव्हा लोक याला धंदा बनवून कोट्यावधी रुपये उकळतात. हे सर्व निषेधार्ह आहे.’

बंगळुरू अभियंता आत्महत्या प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया-

कंगना पुढे म्हणाली, 'तरुणांवर अशा प्रकारचा दबाव असता कामा नये. ते त्याच्या पगारापेक्षा 3 पट जास्त भत्ता देत होते. मात्र त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली जात होती. या दबावाखाली बेंगळुरूच्या अभियंत्याने असे पाऊल उचलले.’ कंगनाने पुढे नमूद केले, ‘मात्र, एका चुकीच्या महिलेमुळे दररोज किती महिलांचा छळ होतो याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. लग्नात 99 टक्के दोष हा पुरुषांचाच असतो, हे देखील आपण मान्य केले पाहिजे. त्यामुळे अशा घटनाही घडतात.’ कंगनाच्या या वादग्रस्त वक्त्यव्यानंतर आता तिच्यावर टीका होऊ लागली आहे. (हेही वाचा: Bengaluru Techie Suicide Case: बेंगलूरू मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या; पोलिसांनी दाखल केला कुटुंबातील 5 जणांविरूद्ध FIR)

दरम्यान, अतुल यांच्या आत्महत्येमुळे समाजातील विवाह आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही न्याय मिळावा, अशी मागणी आता लोक करत आहेत. याबाबत अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण करावी, जी पुरुषांनाही न्याय देण्यास सक्षम असेल, अशी सूचना कंगनाने केली.