Aryan Khan (Photo Credits: Instagram)

गेल्या अनेक महिन्यांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) माध्यमांमध्ये सतत चर्चेत आहे. ड्रग केसमधून सुटका झाल्यानंतर आता आर्यनच्या कारकिर्दीबाबतही तर्क-वितर्क लावले जात आहेत. आर्यनच्या इंडस्ट्रीमधील पदार्पणाबद्दल शाहरुखचे चाहते विशेष उत्सुक आहेत. नुकतेच त्याचे एक जबरदस्त फोटोशूट व्हायरल झाले आहे, यामध्ये तो त्याच्या सुपरस्टार वडिलांसारखा डॅशिंग दिसत होता. तूर्तास आर्यन हा शाहरुखप्रमाणे अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार की नाही, याबाबत स्पष्टपणे काही माहिती नाही.

परंतु आता आर्यन खानला लेखनाची आवड असल्याने त्याला लेखक म्हणून इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला आहे. ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुखचा मुलगा आर्यनला लेखक म्हणून पहिला प्रोजेक्ट मिळाला आहे. ही एक वेब सिरीज असेल. ताजे अपडेट असे आहे की, या सिरीजसाठीचे कास्टिंग सुरू झाले आहे. या शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अनेक कलाकारांनी वेब सीरिजसाठी ऑडिशन दिल्या आहेत. मात्र, अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही.

ज्या पद्धतीने या सिरीजचे काम सुरू आहे त्यानुसार हा शो या वर्षाच्या अखेरीस फ्लोरवर जाईल, असेही सांगण्यात आले. ही वेब सिरीज फिल्म इंडस्ट्रीवर आधारित असणार असल्याचेही समोर आले आहे. लेखक बिलाल सिद्दीकी आर्यनसोबत प्रोजेक्टवर काम करत आहेत. तो नेटफ्लिक्स शो 'बार्ड ऑफ ब्लड'चा सहलेखकही आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अशीही बातमी आली होती की, आर्यनने मुंबईतील एका स्टुडिओमध्ये या शोसाठी टेस्ट शूटचे आयोजन केले होते. 'जर्सी' चित्रपटात दिसणारा प्रीत कमानी या शोमध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा: Adi Purush Controversy: आदिपुरुष चित्रपटगृहात चालू देणार नाही, विश्व हिंदू परिषदेची धमकी)

याआधी शाहरुख खानने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, आर्यनची आवड अभिनयापेक्षा दिग्दर्शन आणि लेखनात आहे. अनेक वर्षांपासून तो यावर काम करत आहे. त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.