चित्रपटसृष्टीत बॉलिवूड शेहनशाह अमिताभ बच्चन यांचे 'अर्धशतक'!
Amitabh Bachchan (PC - Twitter)

भारतीय चित्रपट सृष्टीचे शेहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बॉलिवूडमधील (Bollywood) करिअरला आज म्हणजेच ७ नोव्हेंबरला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. बिग बींनी चित्रपटसृष्टीतील अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ७ नोव्हेंबर १९६९ रोजी बच्चन यांचा 'सात हिंदुस्थानी' चित्रपट प्रदर्शित झाला. या पन्नास वर्षांत बच्चन यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अलिकडे अमिताभ यांची तब्येत नेहमी बिघडत असते. परंतु, त्यांनी सर्व दुखणी बाजूला ठेवून आपलं आयुष्य चित्रपटसृष्टीला आणि प्रेक्षकांना समर्पित केलं. सध्या बिग बी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत. परंतु, या सेटवर आलेल्या प्रेक्षकांना ते 'मी कोणीही मोठा व्यक्ती नाही, मी इथे नोकरी करतो' असं सांगतात. त्यांचा हा मोठेपणा प्रत्येकाला मोठी शिकवण देऊन जातो. (हेही वाचा - अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'गुलाबो सिताबो' या चित्रपटातील हा लूक बघून तुम्हीही व्हाल अचंबित)

दरम्यान, बॉलिवूडमध्ये ५० वर्ष काम करणाऱ्या बच्चन यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भावनिक पोस्ट लिहून अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने 'एक मुलगा म्हणूनच नाही, तर अभिनेता आणि चाहता म्हणूनही तुमच्याकडे पाहताना अभिमान वाटतो. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. पुढील अनेक पिढ्या आम्ही बच्चन यांच्या काळात वाढलो, असं अभिमानाने सांगतील.'

अमिताभ बच्चन यांनी गेल्या ५० वर्षांच्या कालावधीत अनेक भूमिका साकारल्या. काही चित्रपटातील संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. बच्चन यांनी अलीकडे 'चिनीकम', 'निशब्द', 'पा', 'पिकू', 'पिंक', 'बदला', 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' यासारख्या चित्रपटात दमदार भूमिका केल्या. अमिताभ याच्या वयाच्या अनेक अभिनेत्यांनी चित्रपटसृष्टीतून विश्रांती घेतली आहे. मात्र, आजही वयाच्या ७७ व्या वर्षी बच्चन नव्या उमेदीनं काम करतात आणि उत्तम भूमिका बजावतात. आगामी काळात त्यांचे 'झुंड', 'गुलाबो सिताबो', 'ब्रह्मास्त्र'सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका असणार आहे.