अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि आराध्या उपचारासाठी नानावती रुग्णालयात दाखल
Aishwarya Rai Bachchan and Daughter Aaradhya (Photo Credits: Instagram)

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांनादेखील मुंबईच्या नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोघींना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, आज ऐश्वर्या रायमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली. तसेच तिला थोडा ताप जाणवत होता. त्यामुळे आज या ऐश्वर्या आणि आराध्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Pavitra Rishta Fund: सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत एकता कपूरने सुरु केला ‘पवित्र रिश्ता फंड’; जाणून घ्या काय आहे उद्देश)

दरम्यान, 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तर जया बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

अमिताभ बच्चन यांची तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर सोशल मीडियावर बिग बींच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांचे आभार व्यक्त केले होते.