मंगळवारी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला. 14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूत त्याच्या वांद्रे येथील घरात मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळले होते. या प्रकरणी मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. त्याच वेळी, प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) हिने झी 5 चे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल (Tarun Katial) यांच्यासमवेत एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. सुशांतच्या आठवणीमध्ये एकताने ‘पवित्रा रिश्ता फंड’ (Pavitra Rishta Fund) सुरु केला आहे. यामध्ये जमा होणारा निधी मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये सुशांत मुख्य भूमिकेत मध्ये दिसला होता. याच मालिकेमुळे सुशांतला प्रचंड लोकप्रियता लाभली होती व त्यानंतर त्याना चित्रपटाची ऑफर मिळाली. या मालिकेत सुशांतसोबत अंकिता लोखंडे प्रमुख भूमिकेत होती.
याबाबत बोलताना एकता कपूर म्हणते, '10 वर्षांपूर्वीच्या काळापासून आताचा काळ फारच बदलला आहे. सध्या अनेक गोष्टींचा दबाव वाढला आहे. कोरोना विषाणूमुळे सध्या आपण सर्वजण घरात आहोत, त्यामुळे अनेकजण ताण-तणावात आणि चिंतेत आहेत. यासाठी घरातून काम, बंधने, नोकऱ्या जाणे अशी अनेक कारणे आहेत. म्हणून सध्या लोकांचे मानसिक आरोग्य ढासळल आहे. आता 'पवित्र रिश्ता फंडा'चा मी एक भाग झाले हा माझ्यासाठी बहुमान आहे, आणि भविष्यातही मी अशा उपक्रमांचा भाग झाल्याचा मला आनंद होईल.' (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही- गृहमंत्री अनिल देशमुख)
सुशांतसिंह राजपूत देखील नैराश्याला बळी पडला होता. मृत्यूआधी 6 महिने त्याच्यावर उपचार चालू होते. आता हेच कारण आहे की, एकता अशी जनजागृती मोहीम सुरू करणार आहे, जेणेकरुन मानसिकरीत्या कमकुवत असलेल्या लोकांना त्यातून मदत मिळेल.