Govinda Tested COVID-19 Positive: बॉलिवूडवर कोरोनाचे सावट;  अक्षय कुमारनंतर अभिनेता गोविंदाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
Govinda (PC - Facebook)

Govinda Tested COVID-19 Positive: बॉलिवूडमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक सतत वाढत आहे. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नंतर आता गोविंदा (Govinda) देखील कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) सापडला आहे. सध्या गोविंदा होम क्वारंटाईन असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहे. गोविंदाच्या प्रवक्त्याने अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, 'बरीच सावधगिरी बाळगूनही गोविंदाची कोरोना चाचणी सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. त्याच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. सध्या तो होम क्वारंटाईन आहे '.

प्रात्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गोविंदाची कोरोना तपासणी झाली. ज्यामध्ये त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे. सध्या त्याने स्वत:ला घरी अलग ठेवलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच वेळी, गोविंदाच्या घराचे इतर सदस्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. गोविंदाची पत्नी सुनीताने काही आठवड्यांपूर्वी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर आता गोविंदाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. अभिनेत्याने आपल्या संपर्कात असलेल्या लोकांना आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. (वाचा - Akshay Kumar Tested COVID-19 Positive: खिलाडी अक्षय कुमार कोरोना पॉजिटिव्ह, होम क्वारंटाईन असल्याचे सांगत सोशल मिडियाद्वारे दिली माहिती)

आज सकाळी अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं. त्यानंतर दुपारी लगेचचं गोविंदालादेखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आहे. अक्षयने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कोरोना संसर्गाची माहिती दिली होती. यात त्याने म्हटलं होतं की, "मला सर्वांना सांगायचे आहे की, आज सकाळी माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सर्व प्रोटोकॉलचा विचार करून मी स्वत: ला वेगळं केले आहे. मी घरात स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. आवश्यक वैद्यकीय मदत घेत आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना चाचणी करुन घ्या. काळजी घ्या. लवकरच बरा होऊन परत येईल.''

दरम्यान, कोरोनाचे संक्रमण फिल्म इंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील बर्‍याच लोकांमध्ये वेगाने पसरत आहे. अक्षय आणि गोविंदापूर्वी आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, सतीश कौशिक, टीव्ही इंडस्ट्रीच्या स्टार रुपाली गांगुली, सुधांशू पांडे, राजन शाही, अमर उपाध्याय यांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. त्याचबरोबर रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत.