Zee Yuva Sanman: भाजप पक्षाच्या Poonam Mahajan यांचा 'युवा नेतृत्व' पुरस्काराने गौरव
Poonam Mahajan (Photo Credits: File Image)

तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, गेली तीन वर्षे 'झी युवा सन्मान' हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

महाराष्ट्रातील मोठे नेते, प्रमोद महाजन यांच्याकडून त्यांची कन्या पूनम महाजन हिने लहानपणापासूनच नेतृत्वाचे धडे घेतले आहेत. वडिलांच्या निधनानंतर, वयाच्या 26व्या वर्षी भारतीय जनता पक्षाची सदस्य होत, त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. डिसेंबर 2016 पासून 'भारतीय जनता युवामोर्चा'चे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व पूनम महाजन करीत आहेत. पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली, 17 यशस्वी मोहिमा आजवर आखण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील या युवा नेतृत्वाचा योग्य सन्मान 'झी युवा सन्मान 2019'च्या सोहळ्यात 'युवा नेतृत्व सन्मान' या पुरस्काराने करण्यात आला आहे.

या पुरस्काराच्या बरोबरीने, इतरही अनेक पुरस्कार देण्यात आले. सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्कार सुद्धा या सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत. सारंग गोसावी यांना 'सामाजिक जाणीव सन्मान', अक्षय बोरकर यांना 'उद्योजक सन्मान', सारंग नेरकर यांना 'संशोधक सन्मान' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय 'कला सन्मान'चा मान अभिनेता आदिनाथ कोठारे याला, 'संगीत सन्मान'चा मान गुणी गायक जसराज जोशी याला, 'डिजिटल कला सन्मान' हा पुरस्कार सारंग साठ्ये याला मिळाला. 'युवा साहित्य सन्मान' पुरस्काराचा मान मनस्विनी लता रवींद्र हिला मिळाला तर, डॉ. आरती बंग यांना 'युवा संजीवनी सन्मान' व 'एनडीआरएफ'ला 'युवा अलौकिक योगदान सन्मान' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

महाराष्ट्रातील गुणवान युवांचा हा भव्यदिव्य सन्मानसोहळा पाहायला मिळणार आहे 'झी युवा' वाहिनीवर, रविवार 13 ऑक्टोबर रोजी, दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता.