Swarajya Rakshak Sambhaji: डॉ. अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हे हिचे अभिनयात पदार्पण
अमोल कोल्हे आणि आद्या कोल्हे | (Photo courtesy: Facebook)

स्वराज्य रक्षक संभाजी (Swarajya Rakshak Sambhaji) मालिकेच्या माध्यमातून मराठी माणसाच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe ). संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं करण्यात ही ऐतिहासिक मालीका यशस्वी झाली. मालिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयावर पुन्हा एकदा शिकामोर्तब झाले आहे. पण, आता कोल्हे यांची दुसरी पिढीही अभिनय क्षेत्रात येऊ पाहात आहे. कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हे (Aadhya Kolhe) याच मालिकेतून टीव्हीच्या छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचे आणखी एक कारण म्हणजे या मालिकेतील बालकलाकार. मालिकेतील प्रमुख पात्रांसोबतच मालिकेतील बालकलाकारांनीही आपापल्या भूमिका उत्कृष्ट साकारल्या आहेत. जवळपास सर्वच बालकलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आता. दरम्यान, मालिका आता एका उंचीवर आली असून, कधानक पुढे सरत जाईल तसतशी मालिका नव्या वळणावर येऊन ठेपत आहे. तसेच, कथानकाच्या गरजेनुसार नवी पात्रेही समाविष्ठ होत आहेत. मालिकेत तारा नावाचे पात्र सहभागी आहे. या बाल ताराची भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हे साकारत आहे. तारा ही स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आहे. (हेही वाचा, Zee marathi awards 2018 : पहा झी मराठीकडून गौरविण्यात आलेल्या कलाकारांची संपूर्ण यादी)

दरम्यान, आद्याच्या अभिनयाबाबत अमोल कोल्हे उत्सुक असून, बाप-लेकीची ही जोडी प्रेक्षकांना कशी वाटते हे लवकरच समजणार आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्येही त्यांनी आद्याच्या या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली होती. आद्याची ही पहिलीच मालिका असून तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे.