अक्षय खन्ना आणि गीतांजली खन्ना (Photo credit : youtube)

अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांची पत्नी गीतांजली खन्ना (Geetanjali Khanna) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. अलिबागमधील मांडवा येथील त्यांच्या फार्महाउसवर त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांच्या पार्थिवाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गीतांजली यांच्या पार्थिवाला मांडवा येथे अग्नी देण्यात येणार असल्याचे समजते. गीतांजली खन्ना आणि विनोद खन्ना हे 1971 मध्ये विवाहबद्ध झाले होते, पुढे 1985मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही त्यांची दोन मुले आहेत.

अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात खन्ना कुटुंबियांचे फार्म हाऊस आहे. परिवारातील सदस्य नेहमीच या फार्म हाउसला भेट देत असतात. शनिवारी सकाळी गीतांजली खन्ना या मुंबईतून मांडवा येथे आल्या होत्या. त्यांना रात्री त्रास जाणवू लागल्याने खाजगी डॉक्टरला तपासणीसाठी बोलावण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मांडवा येथील घरी नेण्यात येणार असून मांडवा येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लग्नानंतर विनोद खन्ना यांनी ओशो आश्रमात जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला होता, गीतांजली यांच्यासाठी हा फार मोठा धक्का असल्याने त्यांनी विनोद खन्ना यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.